वन्यजीव बचावाचा ‘आशिष’

    29-Oct-2026   


Ashish Joshi Wildlife Rescue

 
छत्रपती संभाजीनगर आणि जालना परिसरात गेल्या काही वर्षांत शेकडो वन्यजीवांचे प्राण वाचवणार्‍या आशिष मिलिंद जोशी या तरुणाचा प्रवास...
 
विहिरीत पडलेला बिबट्या असो, नायलॉन मांज्यात अडकलेला घार पक्षी असो किंवा गंभीर जखमी अवस्थेत सापडलेला साळिंदर; वन्यजीवांसाठी प्रत्येक संकटाच्या क्षणी धावून जाणारा एक तरुण म्हणजे, आशिष मिलिंद जोशी! वन्यजीव आणि माणूस यांच्यातील संघर्षाच्या घटनांमध्ये अनेकदा भीती आणि उदासीनता दिसते. मात्र, याच परिस्थितीत मुक्या जीवांना जीवनदान देण्यासाठी आशिष यांनी उभारलेली यंत्रणा आशेचा किरण ठरली आहे. ही यंत्रणा केवळ बचावकार्यापुरती मर्यादित नाही, तर ती वन्यजीवांविषयी संवेदनशील समाज घडवण्याच्या ध्यासाची कहाणी आहे.
 
दि. ३ सप्टेंबर १९९६ रोजी जन्मलेल्या आशिष जोशी यांनी वास्तुकलेचे शिक्षण घेतले. मात्र, त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू केवळ इमारती आणि बांधकामांपुरता मर्यादित राहिला नाही. वन्यजीवांप्रति असलेल्या आस्थेतून त्यांनी बचावकार्याचा मार्ग निवडला. ‘मॅन विथ इंडीज फाऊंडेशन’चे संचालक आणि वन्यजीव बचाव पथकाचे प्रमुख म्हणून ते छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत कार्यरत आहेत. गेल्या सुमारे सहा वर्षांपासून ते वन्यजीव बचावाच्या कामात सक्रिय आहेत. या कामात केवळ प्राण्याला संकटातून बाहेर काढणे पुरेसे नसते. त्यासाठी योग्य प्रशिक्षण, सुरक्षित साधने, वेळेचे नियोजन आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय आवश्यक असतो. हे लक्षात घेऊन आशिष यांनी आठ प्रशिक्षित सदस्यांचे पथक उभे केले. त्यांना १५०हून अधिक स्वयंसेवकांची याकामी साथ लाभते. वन विभाग, अग्निशमन दल आणि महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधून हे पथक विविध ठिकाणी बचावकार्य करते. वन्यजीवांना सुरक्षितपणे घटनास्थळावरून हलवण्यासाठी ‘रुद्र’ ही विशेष बचाव व्हॅनही उपलब्ध करण्यात आली आहे. मराठवाड्यातील वन्यजीव बचावासाठी समर्पित अशा या वाहनाचा उपयोग विविध मोहिमांमध्ये होतो.
 
या कार्याचा आवाका त्यांच्या बचाव मोहिमांच्या आकडेवारीतून स्पष्ट होतो. उपलब्ध माहितीनुसार, २०२३ मध्ये त्यांच्या पथकाने २४१ वन्यजीवांची सुटका केली. २०२४ मध्ये हा आकडा २६८, तर २०२५ मध्ये ३९१ वर पोहोचला. गेल्या दोन वर्षांत वन्यजीव मदतीसाठी १ हजार २००हून अधिक दूरध्वनी आले आणि दर महिन्याला सरासरी ५६ मदतीच्या विनंत्या हाताळल्या जातात. प्रत्येक फोनमागे एखादा जीव संकटात असण्याची शक्यता असते. त्यामुळे मदतीची हाक मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचणे, परिस्थितीचा अंदाज घेणे आणि सुरक्षित बचाव करणे, ही या पथकाची महत्त्वाची जबाबदारी. या कामातील आव्हाने अनेकदा जीवघेणी असतात. जालन्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्याची मोहीम असो किंवा शेतातील कापणीदरम्यान आईपासून दूर झालेल्या बिबट्याच्या पिलाला पुन्हा तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असो, प्रत्येक प्रसंगात सावधगिरी आणि संयम आवश्यक असतो.
 
विहिरीत पडल्यामुळे दोन्ही पायांना फ्रॅचर झालेल्या साळिंदराच्या बचावाची घटनाही विशेष उल्लेखनीय आहे. गंभीर जखमी अवस्थेतील या प्राण्याला उपचारासाठी मदत करण्यात आली. सुमारे तीन महिन्यांच्या उपचार आणि पुनर्प्राप्तीनंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली. अशा घटनांमधून वन्यजीव बचाव म्हणजे केवळ तातडीची सुटका नसून, गरजेनुसार दीर्घकाळ उपचार आणि निगा राखण्याची प्रक्रियाही असल्याचे दिसून येते.
 
आशिष यांच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जनजागृती. वन्यजीवांबद्दल भीती किंवा गैरसमज निर्माण झाल्यास त्यातून प्राण्यांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांपर्यंत वन्यजीवसंवर्धनाचा संदेश पोहोचवण्यावर त्यांचा भर आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०२४ मध्ये त्यांच्या उपक्रमांतून साडेसहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती करण्यात आली. २० पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्येही विविध उपक्रम राबवण्यात आले. याशिवाय, स्थानिक प्रजातींची ३ हजार ६००हून अधिक झाडे लावण्यात आली असून, त्यातील सुमारे ९० टक्के झाडे जगल्याची नोंद आहे.
 
मात्र, या कामासमोर आर्थिक आणि पायाभूत सुविधांची आव्हाने कायम आहेत. वन्यजीवांचे उपचार, वाहतूक आणि दीर्घकालीन देखभाल, यासाठी मोठा खर्च येतो. जखमी प्राण्यांना पुरेशा काळासाठी सुरक्षित ठेवता येईल, अशा पुनर्वसन सुविधांचीही गरज आहे. त्यामुळे सुसज्ज वन्यजीव उपचार केंद्र उभारणे, बचाव आणि पुनर्वसन व्यवस्था अधिक सक्षम करणे, तसेच नागरिकांचा सहभाग वाढवणे, हे आशिष यांच्या पुढील उद्दिष्ट आहे. वन्यजीवसंवर्धन हे केवळ वन विभागाचे काम नसून, त्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवक, स्थानिक संस्था आणि जागरूक नागरिक यांचीही साथ आवश्यक असते. संकटातील प्रत्येक जीवाला मदत मिळावी, यासाठी आशिष जोशी आणि त्यांचे पथक प्रयत्नशील आहे. माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, अशा बचावकार्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. वन्यजीवांना वाचवण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षित सहअस्तित्वासाठी समाजात संवेदनशीलता निर्माण करणे, हेच या कार्याचे खरे मोल आहे. आशिष यांना पुढील वाटचालीकरिता दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
 




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर