मुंबई (Rapido Ola Uber Driver Verification) : रॅपिडो, ओला आणि उबर यांसारख्या ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांमधील चालकांची आता काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. चालकांची पार्श्वभूमी, परवाने आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे गैरप्रकार आढळल्यास गुन्हे दाखल करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. या सेवांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी गरज भासल्यास स्वतंत्र सुधारित कायदा करण्याचाही विचार करण्यात येणार आहे. (Rapido Ola Uber Driver Verification)
मुंबईतील माहिम परिसरात रॅपिडो बाइक टॅक्सी चालविणाऱ्या एका व्यक्तीविरोधात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. संबंधित व्यक्तीच्या समाजमाध्यम खात्यांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ॲपआधारित वाहतूक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या चालकांची पार्श्वभूमी, वाहन परवाने, आवश्यक कागदपत्रे आणि लागू नियमांचे पालन यांची नियमित तपासणी करण्यावर सरनाईक यांनी भर दिला. तपासणीदरम्यान नियमभंग किंवा कायद्याने दखलपात्र ठरणारे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. (Rapido Ola Uber Driver Verification)
केवळ एखादी घटना घडल्यानंतरच कारवाई करण्याऐवजी या सेवांवर सातत्याने देखरेख ठेवण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चालकांच्या पडताळणीसह प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ॲपआधारित प्रवासी वाहतूक सेवांचा विस्तार लक्षात घेता, या क्षेत्रातील चालक आणि सेवा पुरवठादारांना नियामक चौकटीत आणणे आवश्यक असल्याची भूमिका परिवहन मंत्र्यांनी मांडली. सध्याच्या कायद्यांमधील तरतुदी अपुऱ्या ठरत असतील, तर आवश्यक सुधारणा करून स्वतंत्र कायदा तयार करण्याच्या पर्यायाचाही गांभीर्याने विचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. (Rapido Ola Uber Driver Verification)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.