ठाणे, : (Thane Heavy Vehicle Traffic Restrictions)श्रमजीवी संघटनेच्या ‘संविधान हक्क संघर्ष मोर्चा’मुळे ठाणे शहर आणि परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या मोर्चात एक लाखांहून अधिक आदिवासी सहभागी होण्याची शक्यता असल्याने २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
हा मोर्चा २७ ऑक्टोबरला खारेगाव टोलनाका येथे मुक्काम करणार असून, २८ ऑक्टोबरला मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबरला सकाळी ६ ते २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक अधिसूचना लागू राहणार आहे. पर्यायी मार्गांवरही सहा चाकी व त्यावरील जड वाहनांना निर्बंध असतील. सकाळी ६ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत दहा चाकी व त्यावरील वाहनांना प्रवेशबंदी राहील. पोलीस, अग्निशमन दल, ऑक्सिजन गॅस, जीवनावश्यक व नाशवंत वस्तू आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.(Thane Heavy Vehicle Traffic Restrictions)
वाहनांसाठी पर्यायी मार्ग
नाशिकच्या दिशेने: आनंदनगर चेकनाका, लोढा युटर्न आणि विटावा जकात नाका येथील निर्बंधांमुळे वाहनांनी ऐरोली, महापे, शिळफाटा, पत्रीपूल, दुर्गाडी आणि रांजनोली नाका मार्गे जावे.
गुजरातच्या दिशेने: महापे, माजिवडा वाय-जंक्शन आणि घोडबंदर मार्गाचा वापर करावा.
नवी मुंबई व पनवेलच्या दिशेने: आनंदनगरमार्गे ऐरोली हा पर्यायी मार्ग असेल.
चिचोंटी-मानकोली नाका परिसरातून: रांजनोली नाका, दुर्गाडी, पत्रीपूल आणि शिळफाटा मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
मुरबाडहून मुंबईकडे: दुर्गाडी येथे प्रवेशबंदी असल्याने पत्रीपूल, शिळफाटा आणि महापे मार्गे जावे.
महापे-शिळफाटा मार्गावरील पूजा पंजाब हॉटेल आणि तळोजा-दहिसर मोरी-कल्याण फाटा मार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथेही जड वाहनांना निर्बंध असतील. वाडा रोडवरील नदीनाका-वडपा मार्गाने येणाऱ्या वाहनांना तसेच नाशिकहून मुंबई, नवी मुंबई व पनवेलकडे जाणाऱ्या वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेशबंदी राहणार आहे.(Thane Heavy Vehicle Traffic Restrictions)
वाहतूक नियंत्रणाची अधिसूचना पोलीस उपआयुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी जारी केली असून, नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.