ठाणे (Karjat Hydropower Project): कर्जत येथील प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पामुळे औष्णिक वीजनिर्मितीवरील अवलंबित्व कमी होऊन ४० लाख वाहनांच्या प्रदूषणाएवढे उत्सर्जन टाळता येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यातील या प्रकल्पाच्या समर्थनार्थ भूमिका मांडताना त्यांनी विरोधकांकडून ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवले जात असल्याचा आरोप केला.प्रकल्पाबाबत खोटे कथानक पसरवणे महाराष्ट्रविरोधी असल्याची टीका करत त्यांनी हल्लाबोल केला. (Karjat Hydropower Project)
टोरेंट पॉवर कंपनीच्या या प्रकल्पासाठी ३२ हजार ४९० झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पर्यावरणाच्या संभाव्य हानीबाबत ओरड करत फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला.. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचे सांगत त्याची वस्तुनिष्ठ माहिती समोर आणली. (Karjat Hydropower Project)
प्रकल्पातून तीन हजार मेगावॅट स्वच्छ ऊर्जा उपलब्ध होणार असून, सौरऊर्जेची उपलब्धता कमी असलेल्या वेळेत विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पासाठी सुमारे ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, महाराष्ट्राला वीज आणि रोजगाराच्या संधी मिळतील, असेही त्यांनी नमूद केले. (Karjat Hydropower Project)
प्रकल्पासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात कंपनीच्या खर्चातून वन विभागामार्फत ९० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. प्रकल्पामुळे कोणाचीही उपजीविका बाधित होणार नाही आणि अशी परिस्थिती उद्भवल्यास पुनर्वसनाचा योग्य विचार केला जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. प्रकल्प कायद्याच्या चौकटीतच पूर्ण केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Karjat Hydropower Project)
मात्र, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे स्थानिक जैवविविधता, वन्यजीवांचे अधिवास आणि पर्यावरणीय संतुलनावर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ऊर्जा निर्मिती आणि गुंतवणुकीचे फायदे विरुद्ध पर्यावरणीय हानी, असा या प्रकल्पाभोवतीचा वाद अधिक तीव्र झाला आहे. (Karjat Hydropower Project)