ठाणे (Eknath Shinde Drought Relief) : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मदतीसाठी अर्ज भरण्यापासून पीक नुकसानीचे पंचनामे आणि नुकसानभरपाई मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले. दुष्काळग्रस्त भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पक्षाच्या वतीने टँकर पुरवण्याचाही विचार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने १७९ दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये चार लाख ६० हजार धान्य किट मदतीसाठी पाठविल्या आहेत. मात्र, केवळ मदत पाठवून न थांबता ती गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचते की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत दिले. शिवसेनेचे सर्व आमदार,खासदार,मंत्री आणि महत्वाचे पदाधिकारी या ऑनलाइन बैठकीला उपस्थित होते..धान्य किटसोबत आवश्यक जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि स्थानिक पातळीवरील वितरणावरही लक्ष देण्यास त्यांनी सांगितले. (Eknath Shinde Drought Relief)
नुकसानभरपाईपासून कर्ज पुनर्गठनापर्यंत लक्ष
दुष्काळग्रस्त भागांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे, नुकसानभरपाई, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषी पंपांचा वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा-पाणी आणि रोजगाराच्या प्रश्नांचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केवळ कागदपत्रांची पूर्तता किंवा प्रशासकीय विलंबामुळे पात्र शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शिवसैनिकांनी अर्ज भरण्यापासून पंचनाम्यापर्यंत मदत करावी, असे शिंदे यांनी सांगितले.
प्रत्येक मंत्र्याने सोपवलेल्या दुष्काळग्रस्त भागात नियमित दौरे करावेत. बैठकीपुरते मर्यादित न राहता गावांमध्ये, शेतांमध्ये, बाजारपेठांमध्ये आणि पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी जाऊन शेतकरी, महिला, शेतमजूर, पशुपालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री आणि पालकमंत्र्यांनी दर १५ दिवसांनी प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेऊन मदत प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते की नाही, याची खातरजमा करावी, असे निर्देश देण्यात आले. (Eknath Shinde Drought Relief)
पाणीटंचाईला प्राधान्य; टँकर पुरवण्याचा विचार
दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज, टँकरची उपलब्धता आणि वेळेवर होणारा पुरवठा यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. विहिरी आणि बोअरवेलची स्थिती तसेच पुढील १५ ते ३० दिवसांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन तपासण्याचे निर्देशही देण्यात आले. जनावरांसाठी चारा, पाणी, चारा छावण्या आणि पशुवैद्यकीय सेवांकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. (Eknath Shinde Drought Relief)
दुष्काळाच्या काळात भव्य कार्यक्रम, स्वागत-सत्कार, शक्तिप्रदर्शन, जाहिरातबाजी आणि बॅनर-होर्डिंग्जवरील खर्च टाळून उपलब्ध साधनसंपत्ती मदतकार्यासाठी वापरावी, असे आवाहन शिंदे यांनी केले. पक्ष, जात, गाव किंवा राजकीय मतभेद न पाहता प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde Drought Relief)
सावकारांच्या त्रासाबाबतही उपाययोजना
मायक्रोफायनान्स कंपन्या, बँका आणि खासगी सावकारांकडून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाशी समन्वय साधावा, असेही त्यांनी निर्देश दिले. पदाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या उपाययोजना आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडून त्यांना मंजुरी मिळवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे, तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्नांसाठी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
दुष्काळाच्या काळात राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देण्याचे आवाहन करत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या विचाराची आठवण करून दिली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले. (Eknath Shinde Drought Relief)