'तिसरी मुंबई’ ठरणार महाराष्ट्राचे नवे ग्रोथ इंजिन! नैना’तून १५ लाख रोजगारनिर्मिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही!

नैना क्षेत्रातील विकासकामांचे भूमिपूजन आणि विमानतळ जोडणीच्या पुलांचे लोकार्पण संपन्न

    25-Oct-2026
 
Third Mumbai NAINA Development Project
 
पनवेल (Third Mumbai NAINA Development Project) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रभाव क्षेत्रातील नैना परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून सुमारे १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी पाच लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. या विकासातून निर्माण होणाऱ्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल. शेतकऱ्यांना विकासाचे भागीदार बनवून आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे नैना क्षेत्रातील विकासकामांचे भूमिपूजन तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील जोडणीसाठी उभारण्यात आलेल्या एसबीआर-९, बीआर-४, बीआर-५ आणि उरण बायपास पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटपही करण्यात आले. (Third Mumbai NAINA Development Project)
 
नियोजनबद्ध विकासातून रोजगारनिर्मितीला चालना
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ विमानतळ नसून संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. विमानतळाच्या प्रभाव क्षेत्राचा एकात्मिक विकास आराखड्याद्वारे नियोजनबद्ध आणि कालबद्ध विकास करण्यात येत आहे. एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एरोसिटी आणि नॉलेज सिटी यांसारख्या संकल्पनांमुळे रोजगार, उद्योग आणि सामाजिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील. ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर हा परिसर भविष्यात राज्याच्या आर्थिक विकासाची प्रमुख केंद्रे ठरेल, असे फडणवीस म्हणाले. (Third Mumbai NAINA Development Project)
 
भूधारकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी शासन कटिबद्ध
 
जमिनीशी संबंधित कागदपत्रे भूधारकांच्या हाती दिल्यानंतरच विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गावनिहाय मोजणी, भूखंडांची ओळख, मालकी नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे. भूधारकांचे प्रश्न सुटेपर्यंत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. (Third Mumbai NAINA Development Project)
 
विमानतळ जोडणीसाठी ९५३ कोटींचे पूल
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पूर्वेकडून जलद आणि सुलभ जोडणी देण्यासाठी एसबीआर-९, बीआर-४ आणि बीआर-५ या पुलांच्या प्रकल्पांवर सुमारे ९५३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे पुणे, पनवेल, ठाणे आणि कल्याण परिसरातून विमानतळ, अटल सेतू आणि अन्य प्रमुख मार्गांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.
 
विमानतळापर्यंत सिग्नलविरहित प्रवासाचे उद्दिष्ट
 
मुंबईतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाताना वरळीपासून अटल सेतूपर्यंत सिग्नलविरहित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची एकत्रित सांगड घालून या परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (Third Mumbai NAINA Development Project)
 
दरम्यान, उरण शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे ५०.२६ कोटी रुपये खर्चून ९४१ मीटर लांबीचा बायपास पूल उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांसह मच्छीमार आणि शेतकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
 
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. (Third Mumbai NAINA Development Project)
 
९४ गावांच्या विकासाचे नियोजन
 
सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सुमारे २२५ चौरस किलोमीटर क्षेत्रातील ९४ गावांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी सिडको विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून पार पाडत आहे. विमानतळ, वाहतूक व्यवस्था आणि नागरी विकास यांचा एकात्मिक विचार करून नैना क्षेत्राचे आधुनिक आणि शाश्वत शहरी केंद्रात रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आहे. (Third Mumbai NAINA Development Project)
 
 




संबंधित मजकूर