पनवेल (NAINA Project Pending Issues) : गेल्या अनेक वर्षांपासून नैना क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न प्रलंबित होते. लोकांनी जमिनी दिल्यानंतर त्यांना विकासाचा लाभ मिळाला पाहिजे. तिसऱ्या मुंबईच्या उभारणीत सर्वाधिक श्रेय येथील भूमिपुत्रांचे आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि विविध कनेक्टिव्हिटी प्रकल्पांमुळे हा परिसर ग्रोथ इंजिन म्हणून उभा राहत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक प्रकल्पांना स्थगिती होती; मात्र महायुती सरकारने हे अडथळे दूर करून विकासाला गती दिली. नैना परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कोंढाणे धरणाबाबत प्रयत्न सुरू आहेत. कुठलाही प्रकल्प लोकांवर रेटून न नेता त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे, हाच सरकारचा विकासाचा अजेंडा असल्याचे शिंदे म्हणाले. (NAINA Project Pending Issues)
विमानतळासोबत सक्षम वाहतूक व्यवस्था उभारणे महत्त्वाचे – सुनेत्रा पवार
विमानतळ उभारणे म्हणजे केवळ धावपट्टी तयार करणे नव्हे, तर त्याला सक्षम वाहतूक व्यवस्था जोडणे महत्त्वाचे आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून, हा परिसर मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. आज केवळ प्रकल्पांचे लोकार्पण होत नसून, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून स्थानिकांना विकासाच्या प्रवाहात पुढे नेण्याचे काम होत असल्याचेही त्या म्हणाल्या. (NAINA Project Pending Issues)