ठाणे-भिवंडी मेट्रोला पहिली गाडी; पुढील आठवड्यात चाचणी!

२०२६-२७ या आर्थिक वर्षात मार्ग सुरू करण्याचे नियोजन; ठाणे-भिवंडी प्रवासाचा कालावधी ४५ मिनिटांवरून २५ मिनिटांपर्यंत येणार


Thane Bhiwandi Metro Line 5
 
मुंबई, : (Thane Bhiwandi Metro Line 5)ठाणे ते भिवंडीदरम्यानच्या मेट्रो मार्गिका क्रमांक ५ च्या कामाला आता महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. या मार्गिकेसाठी पहिली मेट्रो गाडी दाखल झाली असून, पुढील आठवड्यापासून चाचणी धावांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. या मार्गिकेवरील प्रवासी सेवा २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ठाणे आणि भिवंडीदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
 
मार्गिका क्रमांक ५ साठी सध्या मेट्रो मार्गिका क्रमांक २ अ आणि ७ वरील अतिरिक्त गाड्यांचा तात्पुरता वापर करण्यात येणार आहे. मंडाले आगारात ठेवण्यात आलेल्या बीईएमएलनिर्मित मेट्रो गाड्या टप्प्याटप्प्याने मेट्रो मार्गिका क्रमांक ४ वर हलविण्यात आल्या. त्यानंतर नवरात्रोत्सवाच्या काळात कासारवडवली येथील जोडमार्गाचा वापर करून एक मेट्रो गाडी मार्गिका क्रमांक ५ वर आणण्यात आली.(Thane Bhiwandi Metro Line 5)
 
चाचणीच्या काळात मेट्रोची यंत्रणा, सिग्नल व्यवस्था आणि अन्य तांत्रिक बाबींची तपासणी केली जाणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच या मार्गिकेवरील रुळ आणि विद्युत उपकरणे कार्यान्वित करण्यात आली आहेत. दुसरीकडे, स्थानकांवरील उर्वरित कामेही समांतर सुरू आहेत.
 
ठाणे ते भिवंडी हा प्रवास सध्या गर्दीच्या वेळेत ४५ मिनिटांपेक्षा अधिक कालावधीचा ठरतो. विशेषतः भिवंडीतील गोदामे, औद्योगिक आस्थापने आणि कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या कामगारांना वाहतूककोंडीचा मोठा फटका बसतो. अनेक प्रवाशांना गर्दीच्या रिक्षांमधून प्रवास करण्यासाठी एका आसनाचे ४० ते ५० रुपये मोजावे लागतात. मेट्रो सुरू झाल्यानंतर हा प्रवास सुमारे २५ मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे वेळ आणि प्रवासखर्चाची बचत होण्यास मदत होईल.(Thane Bhiwandi Metro Line 5)
 
सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध अतिरिक्त गाड्यांच्या आधारे मेट्रो सेवा चालविण्यात येणार असल्याने दोन गाड्यांमधील अंतर पाच ते सहा मिनिटे राहण्याची शक्यता आहे. या तात्पुरत्या व्यवस्थेत वेगही तुलनेने कमी असू शकतो. पुढील वर्षी मार्गिका क्रमांक ५ साठी स्वतंत्र मेट्रो गाड्या उपलब्ध झाल्यानंतर त्यांची स्वतंत्र चाचणी घेऊन सेवेत समावेश केला जाणार आहे.
 
सुमारे ६,७४१ कोटी रुपये खर्चाच्या या ११.९ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर कासारवडवली, बाळकुम, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा आणि धामणकर नाका अशी सात स्थानके असतील. कशेळी येथे मेट्रोचे आगार उभारण्यात आले आहे.
चाचणी धावा काही महिने सुरू राहण्याची शक्यता असून, त्यानंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची अंतिम सुरक्षा मंजुरी आवश्यक असेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रवासी सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. सध्या डिसेंबर २०२६ किंवा २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत मार्गिका सुरू करण्याचे तात्पुरते नियोजन आहे.(Thane Bhiwandi Metro Line 5)
 
या मार्गिकेचे उद्घाटन मिरा-भाईंदरमधील मेट्रो मार्गिका क्रमांक ९ च्या दुसऱ्या टप्प्यासह आणि गायमुख ते कॅडबरी जंक्शनदरम्यानच्या मेट्रो मार्गिका क्रमांक ४ च्या पहिल्या टप्प्यासह होण्याची शक्यता आहे. २०३१ पर्यंत मार्गिका क्रमांक ५ वर दररोज सुमारे ३.०२५ लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.
 
दरम्यान, या मार्गिकेचा पुढील विस्तार कल्याण आणि उल्हासनगरपर्यंत करण्याचे नियोजन असून, दुसऱ्या टप्प्यासाठी २०३०-३१ हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी आणि कल्याण परिसरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.(Thane Bhiwandi Metro Line 5)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर