मुंबई: भाजप आमदार प्रसाद लाड यांनी रामदास कदम यांच्या आरोपांचे खंडन करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. “रामदास कदम यांनी स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी भाजपला बदनाम करू नये. आवाज वाढवून बोललो म्हणजे आम्ही घाबरलो, असे नाही. ते दिवस आता गेले आहेत,” असा स्पष्ट इशारा लाड यांनी दिला. (Prasad Lad on Ramdas Kadam)
मनोज जरांगे यांच्याशी झालेल्या भेटींबाबत बोलताना लाड म्हणाले, “मी जेव्हा जेव्हा अंतरवली सराटीला गेलो, तेव्हा उघडपणे गेलो आहे. त्याचे एक-दोन नव्हे, तर ५०० फोटो उपलब्ध आहेत. माध्यमांसमोर कॅमेऱ्यासमोर चर्चा झाली आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी हा फालतूपणा बंद करावा.” (Prasad Lad on Ramdas Kadam)
रामदास कदम यांनी दाखवलेला फोटो एडिट केलेला असल्याचा आरोपही लाड यांनी केला. “त्या फोटोत विखे पाटील, उदय सामंत आणि शंभूराजे देसाई यांच्यासह सर्वजण आहेत. मी वेगळी बैठक कधी घेतली? उदय सामंत यांनाही मी विचारतो की, त्यांना सोडून मी कधी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Prasad Lad on Ramdas Kadam)
महायुतीतील मतभेदांवर भाष्य करताना लाड म्हणाले, “संजय राऊत जसे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना डुबवायला निघाले आहेत, तसे तुम्ही खरी शिवसेना डुबवायला जाऊ नका. भाजप आणि शिवसेना महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नका.” (Prasad Lad on Ramdas Kadam)
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील मनोज जरांगे यांच्या पूर्वीच्या आरोपांचाही संदर्भ दिला. “त्यावेळी रामदास कदम कुठे होते? देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप झाले, तेव्हा प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली. महायुतीचे कर्तव्य काय आहे, हे तुम्ही आम्हाला सांगायला लावू नका,” असेही ते म्हणाले. (Prasad Lad on Ramdas Kadam)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करताना लाड म्हणाले, “एकनाथ शिंदे हे आमचे महायुतीचे नेते आहेत. त्यांना आम्ही सर्वांनी नेता म्हणून मान्य केले आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर आरोप करण्यापूर्वी संबंधितांशी चर्चा करावी.” (Prasad Lad on Ramdas Kadam)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.