मुंबई, : (Prasad Lad on Sanjay Raut Audio Clip)मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिपने राजकीय वर्तुळात सध्या एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, संजय राऊत हेच या ऑडिओ क्लिपचे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक असून त्यांची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आ. प्रसाद लाड यांनी केली आहे.
संजय राऊत यांनी या ऑडिओ क्लिपवरून प्रसाद लाड यांच्यावर आरोप केले होते. यावर उत्तर देताना पत्रकार परिषदेत प्रसाद लाड म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांनी आपल्या सपनों का सौदागरला आवरावे. आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार, ही क्लिप कुठे बनली? कशी बनली? ती बनवण्यामागे कुणाचा हात आहे? हे आमचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुळात या क्लिपचे दिग्दर्शक, लेखक, निर्माते हे संजय राऊत आहेत. संजय राऊतांनी सामनाच्या प्रेसमध्ये बसून ही स्क्रिप्ट लिहिली आणि १०० कोटींचा आरोप होता तो त्यांनी ५०० कोटींचा केला. त्यामुळे या क्लिपची चौकशी करताना जी एसआयटी नेमली जाईल त्यात संजय राऊतांचीही चौकशी व्हावी, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार आहोत. हा सपनों का सौदागर कोण आहे आणि कशा पद्धतीने स्वप्न विकतोय याचीही चौकशी करायला हवी."(Prasad Lad on Sanjay Raut Audio Clip)
उबाठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, "खिचडीमध्ये दोन पाच लाख रुपये खाणाऱ्यांना आता हा विषय मिळालेला आहे. कोणाच्या अकाउंटमध्ये किती चिंधी चोरी कोणी केली हे महाराष्ट्राने पाहिले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून या प्रकरणाची चौकशी होईल आणि फॉरेन्सिक तपासणी होऊन सत्य समोर येईल, हे सांगितले होते. पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, हा सपनो का सौदागर हाच त्याच्या मागचा निर्माता आहे. ही क्लिप कुणी लिहीली याची चौकशी होऊन तात्काळ कारवाई होईल."
राऊतांचे घबाड बाहेर पडले
"भाजप आणि शिवसेनेत भांडण लावण्याच्या संजय राऊतांच्या षडयंत्राचे घबाड आता बाहेर पडले आहे. आमच्यात आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत कुठेही वाद होणार नाहीत. आम्ही त्यांचा सन्मान करू आणि ताकदीने त्यांच्या मागे उभे राहू. त्या ऑडिओ क्लिपमध्ये जे काही झाले ते चुकीचेच होते. त्यामुळेच त्या क्लिपची चौकशी झाली पाहिजे. ती कुणी कुणापर्यंत कशी पोहोचवली? मनोज जरांगे यांच्यापर्यंत कशी गेली? त्यात कुठले अॅप वापरले? आमचा आरोप आहे की, हे सामनामध्येच झाले असून सामनाच्या स्टुडिओचीही चौकशी झाली पाहिजे. याचा कर्ता करविता संजय राऊत असून त्यांना चौकशीला बोलवले पाहिजे," असेही प्रसाद लाड म्हणाले. तसेच बच्चू कडू यांचे म्हणणे मी ऐकले नाही. पण बच्चू कडू हेदेखील महायुतीत आहेत. त्यामुळे आपण महायुतीचा घटक आहोत हे भान ठेवून त्यांनी बोलले पाहिजे, असे ते म्हणाले.(Prasad Lad on Sanjay Raut Audio Clip)
एआयच्या माध्यमातून व्हॉईस ओव्हर
संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत असतील तर, त्यांचा मनसुबा कधीही पूर्ण होणार नाही. आमच्या माहितीप्रमाणे ही क्लिप सामनाच्या प्रेसमध्ये बनली. त्याची संकल्पना संजय राऊतांची होती. कुणी काय बोलावे, कसे बोलावे ही सगळी कल्पना त्यांचीच होती. एआयच्या माध्यमातून त्याचे व्हॉईस ओव्हरदेखील संजय राऊतांनीच केले. त्यामुळे आधी त्यांचीच चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांना याबद्दल पत्र लिहिणार आहे. एसआयटीने संजय राऊतांना चौकशीसाठी बोलवावे आणि त्यांची चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.(Prasad Lad on Sanjay Raut Audio Clip)
रामदास कदम हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांना भाईच म्हणतो. ते समोर आले तर आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतो. काल त्यांनी जे वक्तव्य केले त्याचे आम्ही उत्तर दिले. काल उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा विषय संपला असे जाहीर केले. रामदास कदम यांनी हा विषय संपवला असल्यास आमच्यासाठीसुद्धा हा विषय संपला आहे. परंतू, संजय राऊतांसारखा सपनों का सौदागर असे भाष्य करत असल्यास त्यांना तसेच उत्तर देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप-शिवसेना एक
"भाजप-शिवसेना एक आहे आणि एक राहील. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हे महायुतीमुळे भक्कम राहतील याची काळजी महायुतीचा समन्वयक म्हणून मी घेईल," असेही प्रसाद लाड म्हणाले.(Prasad Lad on Sanjay Raut Audio Clip)
संजय राऊतांवर गुन्हा दाखल करावा - नवनाथ बन
गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात गाजत असलेली ५०० कोटींची बनावट ऑडिओ क्लिप जनाब संजय राऊत यांच्या वॉर रूममध्ये एआयच्या सहाय्याने तयार करून छत्रपती संभाजीनगरातील एका व्यक्तीमार्फत मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याची धक्कादायक आणि गंभीर बाब समोर येत आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. संजय राऊत यांच्या टीममार्फत साधारणतः गेल्या दोन महिन्यांपासून ही ऑडिओ क्लिप तयार करण्याचे काम करण्यात येत होते. त्यासाठी या ऑडिओ क्लिपमध्ये आवाज असलेल्यांचे यूट्यूबवरील ऑडिओ सॅम्पल घेऊन ही ऑडिओ क्लिप बनवण्यात आली असण्याची दाट शक्यता आहे. भाजपा, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांचे नुकसान करायचे असल्याने या तिघांचीही प्रतिमा मलीन करण्यासाठी हे षडयंत्र संजय राऊत यांनी रचले. सामनाच्या संपादकीय कार्यालयात बसून कोणाचे डायलॉग काय असावेत, याची संपूर्ण स्क्रिप्ट स्वतः संजय राऊत यांनी लिहिली. त्या स्क्रिप्टनुसार, सुरुवातीला १०० कोटींचा उल्लेख करावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र, ५०० कोटींची ऑडिओ क्लिप तयार केल्यास त्याचे गांभीर्य वाढेल आणि प्रसारमाध्यमांमध्ये तो मुद्दा चालेल, यासाठी संजय राऊत यांनी रकमेचा आकडा १०० कोटींऐवजी ५०० कोटी केला. या सगळ्या ऑडिओ क्लिपचे मास्टरमाइंड आणि सर्वेसर्वा स्वतः संजय राऊत आहेत. ही वॉर रूम वाशी परिसरात उभारण्यात आल्याची माहितीही माझ्याकडे आहे. त्यामुळे संजय राऊतांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.(Prasad Lad on Sanjay Raut Audio Clip)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....