मुंबई, : (NHAI toll plaza toilet guidelines)राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधाजनक करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल प्लाझांवरील सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि वाहनतळांच्या देखभालीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या नियमांमध्ये स्वच्छता, महिलांची सुरक्षा, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, तंत्रज्ञानाधारित देखरेख आणि देखभालीतील निष्काळजीपणासाठी आर्थिक दंड यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शुक्रवार, दि.२३ ऑक्टोबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, विद्यमान स्वच्छतागृहांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती आणि बदल केले जाणार आहेत. यामध्ये फरशा, नळ व्यवस्था, स्वच्छता विषयक उपकरणे, प्रकाशयोजना, वायुवीजन, सांडपाणी निचरा आणि दिशादर्शक फलकांचा समावेश असेल. स्वच्छतेचे वेळापत्रक संबंधित स्वच्छतागृहांचा आकार आणि महामार्गावरील वाहतुकीची तीव्रता लक्षात घेऊन निश्चित केले जाईल.(NHAI toll plaza toilet guidelines)
रात्रीच्या प्रवासात महिला आणि कुटुंबांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था, वाहनतळ आणि स्वच्छतागृहांकडे जाणाऱ्या मार्गावर सीसीटीव्ही देखरेख, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि स्पष्ट माहितीफलक उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक संबंधित टोल प्लाझावर दिव्यांगांसाठी किमान एक सर्वांसाठी सुलभ स्वच्छतागृह असणे बंधनकारक असेल. त्यामध्ये अडथळा मुक्त प्रवेश, योग्य रुंदीची दारे आणि आधारासाठी ग्रॅब बार यांसारख्या सुविधा असतील. वाहनतळांमध्ये निश्चित पार्किंग जागा, योग्य जलनिचरा आणि भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उभारण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
स्मार्ट मॉनिटरिंग प्रणालीद्वारे पाण्याची उपलब्धता, दुर्गंधी, सांडपाण्याची पातळी, गळती, वीजपुरवठा आणि स्वच्छतागृहांतील गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे. पाण्याची कमतरता, सांडपाणी ओसंडणे किंवा उपकरणांमध्ये बिघाड झाल्यास स्वयंचलित सूचना दिल्या जातील.(NHAI toll plaza toilet guidelines)
या प्रणालीतील माहिती एनएचएआयच्या केंद्रीय डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडली जाणार आहे. प्रवाशांना राजमार्गयात्रा ॲपशी जोडलेल्या क्यूआर कोडद्वारे तसेच स्वच्छतागृहांमध्ये बसवलेल्या टचस्क्रीनच्या माध्यमातून तक्रारी आणि अभिप्राय नोंदवता येतील.
स्वच्छतागृहे, सेप्टिक टँक, सोक पिट आणि सांडपाणी वाहिन्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असेल. सेप्टिक टँक, मॅनहोल आणि सांडपाणी वाहिन्यांमध्ये मानवी प्रवेशास सक्त मनाई करण्यात आली आहे. देखभालीच्या गुणवत्तेसाठी दैनंदिन देखरेख, साप्ताहिक तांत्रिक तपासणी, मासिक संयुक्त आढावा, त्रैमासिक लेखापरीक्षण आणि वार्षिक त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन केले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना त्रुटी दूर करण्यासाठी मुदत दिली जाईल. निकृष्ट देखभाल करणाऱ्या संस्थांवर आर्थिक दंड आकारला जाईल, तर वारंवार नियमांचे पालन न करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जाऊ शकते.(NHAI toll plaza toilet guidelines)