
मुंबई, : (Mumbai Well Revival)मुंबईतील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पर्यायी पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांसाठी नगरसेवक तथा मुंबई भाजपचे सचिव प्रतिक कर्पे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुंबईतील विहिरींच्या स्वच्छता व पुनरुज्जीवनासाठी प्रत्येक प्रभागाला ३० लाख रुपयांचा प्राथमिक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या मार्गदर्शनातून या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. या विषयाच्या अनुषंगाने आज महापौर दालनात बैठक झाली. या बैठकीला इस्रोचे माजी शास्त्रज्ञ उपस्थित होते.(Mumbai Well Revival)
मुंबईतील पारंपरिक विहिरींची स्वच्छता करणे, त्यातील गाळ काढणे, आवश्यक डागडुजी करणे आणि त्यांचा पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी वापर करणे, यासाठी कर्पे यांनी महापालिका स्तरावर पाठपुरावा केला आहे. त्यांनी महापालिका सभेत ठरावाच्या सूचनेद्वारेही विहिरींच्या पुनरुज्जीवनाची मागणी केली होती. सभागृह नेते गणेश खणकर यांनी देखील या विषयावर सातत्याने आवाज उठवला होता. या प्रयत्नांमुळे मुंबईतील पर्यायी जलस्रोतांच्या विकासाला चालना मिळत आहे.
महापालिकेच्या नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागातील खुल्या विहिरींची निवड करून त्यांची स्वच्छता, गाळ उपसा आणि आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे. तसेच, प्रत्येकी ५,००० लिटर क्षमतेची पाणीसाठवण टाकी, २ एचपी क्षमतेचा उपसा पंप आणि संबंधित यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. या कामांसाठी प्रति विहीर सुमारे ४.८२ ते ५ लाख रुपयांचे नमुना अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मंजुरीने अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.(Mumbai Well Revival)
मुंबईतील विहिरी, तलाव आणि नैसर्गिक जलस्रोतांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान, जीआयएस मॅपिंग आणि IoT आधारित स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग यंत्रणेचा वापर करण्याची संकल्पना कर्पे यांनी पुढे आणली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने जलस्रोतांचे सर्वेक्षण, उपलब्धतेचे मूल्यांकन आणि भविष्यातील उपयुक्तता तपासण्यावर भर दिला जाणार आहे.(Mumbai Well Revival)
मुंबईतील पाणीपुरवठ्यावरील वाढता ताण लक्षात घेता पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था आणि उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन या उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मुंबईकरांना आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी प्रतिक कर्पे यांचा जलस्रोत संवर्धन आणि दीर्घकालीन जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांसाठी पाठपुरावा सुरू आहे.(Mumbai Well Revival)