आयसीटीमधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येची सखोल चौकशी करा; अभाविप मुंबईची मागणी

    23-Oct-2026   

ICT Student Suicide
 
मुंबई (ICT Student Suicide)मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) येथे रासायनिक अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या सिद्धेश पाटील या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबईने दुःख व्यक्त केले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, तसेच विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर संस्थेने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आयसीटीच्या संचालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अभाविप मुंबईने तीन प्रमुख मागण्या मांडल्या. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्र सुरू करावे, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, वसतिगृहातील समस्या आणि इतर तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.(ICT Student Suicide)
 
विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण, मानसिक आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी या विषयांकडे शैक्षणिक संस्थांनी गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक ते समुपदेशन मिळावे, त्यांच्या समस्या मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी संस्थेने आवश्यक ती पावले उचलावीत, असे अभाविप मुंबईने म्हटले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन संस्थेच्या प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अभाविप मुंबईने केली आहे.(ICT Student Suicide)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर