मुंबई, : (Viksit Bharat Mumbai Marina)मुंबईच्या सागरी पर्यटनाला आणि किनारपट्टी विकासाला चालना देण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने व्हिक्टोरिया डॉक येथे ‘विकसित भारत मुंबई मरिना’ उभारण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पासाठी अंदाजे ९२२.६७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, सार्वजनिक-खासगी भागीदारीतून ४५ वर्षांच्या करारावर त्याची उभारणी, संचालन आणि देखभाल केली जाणार आहे. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२६ आहे.
केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई बंदर प्राधिकरणाने बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील घोषणा केली. या मरिनामध्ये यॉटसाठी सुरक्षित जलक्षेत्र, नौकानयन सुविधा आणि पर्यटनाशी संबंधित विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रकल्प पूर्ण क्षमतेने विकसित झाल्यानंतर ३७.३ हेक्टर संरक्षित जलक्षेत्रात ६०४ यॉट उभ्या करण्याची सुविधा उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात ४२४ यॉटसाठी जागा तयार केली जाणार आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने संरक्षक भिंत, सुमारे १५० मीटर लांबीचा प्रवेश मार्ग, सहा सेवा मंच, तरंगते धक्के, जोडमार्ग आणि बंदरातील आवश्यक खोली वाढवण्यासाठी गाळ उपसण्याच्या कामांना सुरुवात केली आहे. संपूर्ण प्रकल्प क्षेत्रासाठी आवश्यक पर्यावरणीय आणि किनारपट्टी नियमन क्षेत्रविषयक मंजुरी मिळाली असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.(Viksit Bharat Mumbai Marina)
खासगी सवलतधारकाकडून मरिनाच्या किनारपट्टीवरील सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये मरिना टर्मिनल इमारत, आंतरराष्ट्रीय दर्जाची नौकानयन प्रशिक्षण संस्था, यॉट क्लब, यॉट दुरुस्ती केंद्र, नौका साठवण सुविधा, इंधन केंद्र, पंचतारांकित हॉटेल, पर्यटन व्यवसाय केंद्र, खाद्यपदार्थ व किरकोळ विक्री विभाग तसेच नौका प्रदर्शन आणि विविध कार्यक्रमांसाठी मैदानाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यानंतर यॉटसाठी उपलब्ध जागेचा विस्तारही करण्यात येणार आहे. खासगी भागीदाराला ४५ वर्षे प्रकल्पाचे संचालन आणि देखभाल करावी लागेल. कराराची मुदत संपल्यानंतर प्रकल्पातील मालमत्ता मुंबई बंदर प्राधिकरणाकडे हस्तांतरित केली जाईल.
या प्रकल्पासाठी एकाच टप्प्यात दोन लिफाफ्यांद्वारे इलेक्ट्रॉनिक निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाला एकूण महसुलातील किती टक्के वाटा दिला जाईल, हा निवडीचा प्रमुख निकष असेल. सर्वाधिक महसूल वाटा देण्याची तयारी दर्शविणाऱ्या पात्र निविदाधारकाला प्राधान्य दिले जाईल. एक स्वतंत्र संस्था किंवा जास्तीत जास्त चार सदस्यांचा समूह म्हणून निविदेत सहभागी होता येणार आहे. निविदा संबंधी प्रश्न पाठवण्याची अंतिम तारीख दि. २८ ऑक्टोबर आहे. पहिली पूर्व निविदा बैठक दि. ३० ऑक्टोबरला, तर दुसरी बैठक दि. २५ नोव्हेंबरला होणार आहे. निविदा दि. १५ डिसेंबर २०२६ पर्यंत सादर कराव्या लागतील.(Viksit Bharat Mumbai Marina)
सागरी पर्यटनाला नवी दिशा
मुंबईची ओळख समुद्राशी जोडलेली आहे. या प्रकल्पामुळे बंदराच्या कार्यरत क्षेत्रातील काही भागाचा नियोजनबद्ध सागरी पर्यटन, नौकानयन आणि किनारपट्टीवरील सेवांसाठी उपयोग करता येईल. त्याचवेळी बंदरातील नियमित कामकाज आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.- डॉ. एम. अंगमुथू, अध्यक्ष, मुंबई बंदर प्राधिकरण