ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २६४ शाळांच्या इमारती धोकादायक

७२५ इमारतींच्या मोठ्या दुरुस्तीची गरज; २०० कोटींचा आराखडा प्रस्तावित

    22-Oct-2026

Thane Zilla Parishad Schools
 
ठाणे, : (Thane Zilla Parishad Schools)गळणारी छते, भिंतींना पडलेल्या भेगा आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्याचे गंभीर चित्र ठाणे जिल्ह्यात समोर आले आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या २६४ शाळांच्या इमारती धोकादायक ठरल्या असून, तब्बल ७२५ इमारतींच्या मोठ्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. या शाळांच्या पुनर्बांधणीसह दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सुमारे २०० कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित केला आहे.
 
ठाणे जिल्हा परिषदेच्या आकडेवारीनुसार, पाच तालुक्यांतील १,३२५ शाळांच्या एकूण २,८३९ इमारतींचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये २६४ इमारती धोकादायक, ७२५ इमारती मोठ्या दुरुस्तीच्या, तर ५२१ इमारती किरकोळ दुरुस्तीच्या श्रेणीत आहेत.
 
मुरबाड, शहापूरमध्ये स्थिती गंभीर
 
मुरबाड तालुक्यात ११३ इमारती धोकादायक असून, २४६ इमारतींना मोठ्या दुरुस्तीची गरज आहे. शहापूरमध्ये २० इमारती धोकादायक, १८० मोठ्या दुरुस्तीच्या, तर २८५ इमारती किरकोळ दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. भिवंडी तालुक्यात ५३, कल्याणमध्ये ७२, तर अंबरनाथ तालुक्यातील सहा शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.(Thane Zilla Parishad Schools)
 
पावसाळ्यात छतांमधून पाणी गळणे, भिंतींना तडे जाणे, संरक्षक भिंतींचा अभाव आणि वापरण्यायोग्य स्वच्छतागृहांची कमतरता अशा समस्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागांत पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने नियमित वर्ग भरवण्यातही अडचणी येत आहेत.(Thane Zilla Parishad Schools)

२०० कोटींचा आराखडा; यंदा १३ कोटींची कामे
 
धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी, नव्या वर्गखोल्यांची उभारणी, इमारतींची मोठी दुरुस्ती, संरक्षक भिंती आणि स्वच्छतागृहांची दुरुस्ती अशा कामांचा २०० कोटींच्या प्रस्तावित आराखड्यात समावेश आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करण्याचे नियोजन असून, यंदा नव्या वर्गखोल्यांच्या कामांसाठी सुमारे १३ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.(Thane Zilla Parishad Schools)
 
मात्र, प्रस्तावित आराखड्याला निधी कधी मिळणार आणि धोकादायक इमारतींची कामे प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीची पावले उचलावी अशी मागणी पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे..
 




संबंधित मजकूर