वेगवान पायाभूत सुविधांमुळे ‘मुंबई ५९ मिनिटांत’; संकल्पाचे पूर्णत्व दृष्टिपथात येत असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास


Mumbai in 59 Minutes
 
मुंबई, : (Mumbai in 59 Minutes)मुंबई महानगर क्षेत्रात महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची वेगाने निर्मिती करण्यात येत आहे. या गतिमान पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे मुंबई महानगर क्षेत्रात पोहचण्यासाठी ' ५९ मिनिटात मुंबई ' संकल्पाचे पूर्णत्व दृष्टिपथात येत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या ' मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी'च्या कामामुळे वेगवान संपर्क जोडणीसह नागरिकांच्या ' इज ऑफ लिविंग' मध्ये कमालीची सुधारणा होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
 
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या एन विभागातील विद्याविहार रेल्वे स्थानकावरील लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा रेल्वेपूल, शीव रेल्वेस्थानक येथील उड्डाणपूल तसेच गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी जंक्शन ते चित्रनगरीपर्यंतचा उड्डाणपूल यांचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आले.(Mumbai in 59 Minutes)
 
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर तथा कार्यक्रमाच्या अध्यक्ष रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थिती होती.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विद्याविहार, शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळील पूल आणि गोरेगाव येथील तिन्ही पुलांची वैशिष्ट्य म्हणजे ते मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाच्या अडथळ्यांवर उपाय देतानाच रस्ते आणि रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढविण्यासही हातभार लावतील. एका बाजूला रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, तर दुसऱ्या बाजूला लोकल रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा आणि संधी उपलब्ध होतील. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान देणाऱ्या बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतील सर्व अधिकारी, अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो, असे मुख्‍यमंत्री फडनवीस यांनी सांगितले. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.(Mumbai in 59 Minutes)
 
मुंबईच्‍या महापौर रितू तावडे अध्‍यक्षीय भाषणात म्‍हणाल्‍या की, मुंबईत पैशांपेक्षाही माणसाच्या घामाचे आणि वेळेचे मूल्य जास्त आहे. या महानगरात धावणाऱ्या प्रत्येकासाठी सर्वात मोलाची गोष्ट म्‍हणजे वेळ आहे. सकाळी घराबाहेर पडणारा चाकरमानी संध्याकाळी सुरक्षित आणि वेळेत घरी पोहोचला, तरच विकासाला खरा अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे आज लोकार्पण होणारे हे तीन पूल मुंबईकरांच्या घरात वेळेवर आनंद पोहोचवणारे विश्वासाचे सेतू ठरतील, याची खात्री आहे.
 
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या समन्वयातून अनेक मोठे प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहेत. तिन्ही स्तरांवरील यंत्रणांच्या समन्वयामुळे ही कामे वेळेत पूर्ण होत आहे. या सुविधांमुळे मुंबईतील पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होत आहे. या कामगिरीबद्दल मनपा प्रशासन आणि अभियंते, कंत्राटदार, अधिकारी आणि कामगारांचे त्यांनी अभिनंदनही केले. प्रास्ताविक मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले. यावेळी अतिरिक्त मनपा आयुक्त अभिजित बांगर, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उपस्थित होते.(Mumbai in 59 Minutes)
 
महानगरपालिका आयुक्‍त अश्विनी भिडे प्रास्‍ताविकात म्‍हणाल्‍या की, या महत्त्वपूर्ण पूल प्रकल्पांमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा आणि गती मिळण्यास मदत होणार आहे. मुंबईसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या महानगरात वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवासाचा वेळ वाचवणे आणि नागरिकांना अधिक सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या पायाभूत सुविधा महागनरातील वाहतूक व्यवस्थेला नवी गती देण्यासोबतच मुंबईच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्‍वास आहे.
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर