महाराष्ट्राचे स्वतंत्र रसायन उद्योग धोरण लवकरच; इंडिया केम २०२६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
महाराष्ट्राचे स्वतंत्र रसायन उद्योग धोरण जाहीर होणार; पालघरमध्ये भव्य रसायन उद्योग क्षेत्र; गुंतवणूक तिप्पट करण्याचे लक्ष्य; आयात अवलंबित्व कमी करण्यावर भर
मुंबई, : (Maharashtra Chemical Industry Policy)महाराष्ट्रात रसायन उद्योगातील गुंतवणूक वाढवण्यासाठी स्वतंत्र रसायन उद्योग धोरण तयार करण्यात येत असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते जाहीर केले जाणार आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून उद्योगाचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, रसायन उद्योगातील सध्याची रोजगारनिर्मिती दुप्पट आणि गुंतवणूक तिप्पट करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबईत आयोजित दोन दिवसीय ‘इंडिया केम २०२६’च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात रसायन उद्योगाशी संबंधित सुमारे ३,६०० उद्योग कार्यरत आहेत. देशाच्या रसायन उद्योगातील एकूण स्थूल मूल्यवर्धनात महाराष्ट्राचा वाटा १९ टक्के, तर या क्षेत्रातील देशाच्या निर्यातीत राज्याचा वाटा १७ टक्के आहे. या उद्योगातून सध्या सुमारे तीन लाख रोजगार निर्माण होत असून, योग्य धोरण आणि वाढत्या गुंतवणुकीच्या माध्यमातून ही क्षमता दुप्पट करता येईल.(Maharashtra Chemical Industry Policy)
रसायन उद्योगात आयातीला पर्याय निर्माण करण्यासाठी मोठी संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मिथेनॉल आणि अॅसिटिक अॅसिडसारख्या काही घटकांसाठी भारताला ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत आयातीवर अवलंबून राहावे लागते. औषधनिर्मिती क्षेत्रात भारताची जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका असली, तरी सक्रिय औषधी घटकांच्या (एपीआय) उत्पादनात अजूनही मोठी क्षमता विकसित करण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या बल्क ड्रग पार्क उपक्रमाच्या माध्यमातून औषधनिर्मितीसाठी आवश्यक घटकांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातही बल्क ड्रग पार्क उभारून त्याभोवती औद्योगिक परिसंस्था विकसित करण्याचे नियोजन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पालघरमध्ये भव्य रसायन उद्योग क्षेत्र
तळोजा, नवी मुंबई, तारापूर, पालघर, पाताळगंगा, रोहा, लोटे-परशुराम आणि कुरकुंभ या भागांत रसायन उद्योगाचे जाळे विकसित झाले आहे. विदर्भातील बुटीबोरी येथेही या उद्योगाचा विस्तार होत आहे. यापुढे पालघरमध्ये प्रस्तावित वाढवण बंदराच्या परिसरात मोठे रसायन उद्योग क्षेत्र उभारण्याची सरकारची योजना आहे. वाढवण बंदर पुढील तीन वर्षांत तयार होण्याची अपेक्षा असून, बंदराच्या परिसरातील अडीच हजार ते पाच हजार एकर जमीन उपलब्ध करून रसायन उद्योगासाठी भव्य औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रसायन उद्योग पार्कच्या संकल्पनेच्या अनुषंगाने महाराष्ट्रातही तयारी सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.(Maharashtra Chemical Industry Policy)
२०४० पर्यंत एक लाख कोटी नव्हे, एक लाख कोटी डॉलरचे लक्ष्य
देशाच्या औद्योगिक विकासात रसायन उद्योगाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगताना फडणवीस यांनी २०४० पर्यंत हा उद्योग एक लाख कोटी डॉलरच्या स्तरावर नेण्याच्या दृष्टिकोनाचा उल्लेख केला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक लाख कोटी डॉलरची करण्याच्या उद्दिष्टातही रसायन उद्योग महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्योगांसाठी ‘मैत्री’ हे एक खिडकी सुविधा व्यासपीठ आणि ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सुलभ सेवा देण्यावर भर दिला जात आहे. उद्योगांना विविध विभागांकडे वारंवार जावे लागू नये, तसेच व्यवसाय सुलभतेत वाढ व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘इंडिया केम २०२६’मध्ये सुमारे आठ हजार व्यावसायिक प्रतिनिधी सहभागी होण्याची अपेक्षा असून, २०० हून अधिक प्रदर्शकांनी सहभाग नोंदवला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर भारताला नवीन पुरवठा साखळी विकसित करण्याची संधी असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.(Maharashtra Chemical Industry Policy)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.