सुधाकर कोहळे ३० हजार मतांनी जिंकणार; बावनकुळेंचा दावा

सामायिक जमिनीच्या नोंदणी नियमांवर भाष्य; राज ठाकरे, रोहित पवार आणि ‘फ्रेंडशिप फाइल्स’वरही बावनकुळेंची टीका

    22-Oct-2026


 Chandrashekhar Bawankule Statement

 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule Statement)नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे हे ३० हजार मतांच्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गृरुवारी नागपूरला प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
 
नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना विजयी करण्यासाठी आपण संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात मतदारांशी संवाद साधला असता, सरकारच्या माध्यमातून आपले प्रश्न सुधाकर कोहळे सोडवू शकतात, अशी भावना मतदारांमध्ये दिसून आली. पदवीधरांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून काम करण्यास कोहळे योग्य आहेत. त्यामुळे ते ३० हजार मतांच्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.(Chandrashekhar Bawankule Statement)
 
सामायिक जमिनीच्या मोजणीशिवाय नोंदणी होणार नाही;
सातबारा उताऱ्यावरील नव्या नियमाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले,
 
सामायिक शेतीच्या जमिनीची मोजणी करून प्रत्येकाचा हिस्सा निश्चित केल्याशिवाय जमिनीची नोंदणी करता येणार नाही. या निर्णयामुळे जमिनीच्या हिश्शांवरून निर्माण होणारे वाद टाळता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी एका सातबारा उताऱ्यावर चार व्यक्तींची नावे असतानाही त्यातील एखादी व्यक्ती जमिनीची विक्री करू शकत होती. मात्र, विक्रीनंतर प्रत्यक्ष जमिनीवर गेल्यावर कोणाच्या वाट्याला कोणता भाग आला, यावरून वाद निर्माण होत होते. त्यामुळे न्यायालयात खटले दाखल होत होते आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाले होते.
 
हे वाद टाळण्यासाठी आता सामायिक शेतीच्या जमिनीची मोजणी करून प्रत्येकाचा हिस्सा वेगळा केल्याशिवाय विक्री करता येणार नाही. सामायिक जमिनीची मोजणी झाल्याशिवाय नोंदणीही होणार नाही. या निर्णयामुळे जमिनीच्या हिश्शांवरून निर्माण होणारे वाद टाळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. तुकडेबंदी कायद्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले , संबंधित कायदेशीर तरतुदी रद्द केल्यामुळे जमिनीचे निवासी वापरासाठी रूपांतर करून त्यानंतर विक्री करता येईल.(Chandrashekhar Bawankule Statement)
 
‘दिवाळी आली की फटाके फुटतात’
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विधानाबाबत विचारले असता बावनकुळे यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, “दिवाळी आली की फटाके फुटतात. त्यामुळे दिवाळीचा एक फटाका फुटला.
 
‘फ्रेंडशिप फाईल्स’वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणे चुकीचे
 
‘फ्रेंडशिप फाईल्स’ डॉक्युमेंटरीच्या संदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या पंचवीस वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहेत. देशाचा आणि राज्याचा विकास करायचा असेल, तर व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रही महत्त्वाचे आहे. त्यामुळे व्यावसायिकांसोबत बैठका होणे किंवा त्यांच्या समस्या समजून घेणे, याचा अर्थ सरकार त्यांना अनुचित मदत करते, असा होत नाही.
 
देशाचा विकास साधायचा असेल, तर व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या फाईल्स तयार करून अदानी आणि अंबानी यांच्याशी संबंध असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसने ६५ वर्षे देशात सत्ता उपभोगली. आता केंद्रातील सत्तेपासून दूर असल्याने नकारात्मकता पसरवून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, देशाची जनता विकासाच्या पाठीशी आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.(Chandrashekhar Bawankule Statement)
 
तक्रार आल्यास मनोज जरांगे यांच्या आरोपांची चौकशी
 
मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित व्यक्तीने सरकारकडे रीतसर तक्रार केली, तर तिची चौकशी करण्यात येईल.
“मला मनोज जरांगे यांच्याबद्दल काहीही बोलायचे नाही. त्यांना जे बोलायचे आहे, ते बोलण्यास ते स्वतंत्र आहेत. त्यांनी सरकारकडे तक्रार केली असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा संबंधित यंत्रणा तिची चौकशी करतील. तक्रार नेमकी कोणत्या पोलीस ठाण्यात किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर तक्रारीनुसार पुढील
कार्यवाही होईल,” असे बावनकुळे म्हणाले.
 
संजय राऊत यांनी देशद्रोहासारखी विधाने करू नयेत
 
अल्बेनियातील सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीला आग लागल्याच्या घटनेच्या संदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर बावनकुळे यांनी आक्षेप घेतला. अशा घटनांमधून समाजाने शिकले पाहिजे, असे म्हणण्याचा नेमका अर्थ काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
 
भारतीय संविधानाने देशाला मजबूत लोकशाही व्यवस्था दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देशाचा कारभार चालतो. परदेशातील अशा घटनांचा संदर्भ देऊन भारतातही असे घडावे, असा अर्थ निघणारी विधाने करणे योग्य नाही. संजय राऊत यांनी देशद्रोहासारख्या विषयांवर विधाने करू नयेत, असे बावनकुळे म्हणाले.(Chandrashekhar Bawankule Statement)

भारतात परदेशातील अशा घटना घडू शकत नाहीत
 
फ्रान्समधील आंदोलनाच्या संदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, भारताचे संविधान मजबूत असून देशातील लोकशाही व्यवस्था सक्षम आहे. परदेशात घडणाऱ्या घटनांची भारताशी तुलना करता येणार नाही. भारतीय जनता अशा घटनांना समर्थन देत नाही. कोणी चिथावणी देऊन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी भारतातील जनता अशा प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
 
रोहित पवारांची पत्रकार परिषद म्हणजे ‘नौटंकी’
 
आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेवर टीका करताना बावनकुळे यांनी या प्रकाराला ‘नौटंकी’ संबोधले. महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचा आणि जनतेचे लक्ष विकासाच्या प्रश्नांवरून दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
“प्रेझेंटेशन करून जनतेला काही देणे-घेणे नाही. लोकांना दुष्काळाची मदत हवी आहे. विकासाच्या मुद्द्यांवर बोलले पाहिजे. दररोज असे कार्यक्रम करून महाराष्ट्र आणि देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला काही अर्थ नाही,” असे बावनकुळे म्हणाले.(Chandrashekhar Bawankule Statement)
 
केंद्रीय मंत्री अमितजी शाह यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त बावनकुळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अमित शाह यांनी देशाला परमवैभवापर्यंत नेण्यासाठी आणि भारताला मजबूत करण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे, असे ते म्हणाले.
अमित शाह यांचे जीवन पारदर्शकता, कठोर परिश्रम आणि समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारे आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.(Chandrashekhar Bawankule Statement)
 




संबंधित मजकूर