‘उद्धव ठाकरेंची भाषा देशविरोधी शक्तींशी मिळतीजुळती’; कॅबिनेट मंत्री नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात

दसरा मेळाव्यातील भाषणावरून ठाकरेंवर जोरदार टीका; ‘रेजिम चेंज’च्या विधानावरून संजय राऊत यांनाही सुनावले


Nitesh Rane on Uddhav Thackeray
 
मुंबई, : (Nitesh Rane on Uddhav Thackeray)शरिया, उमर खालिद, अफझल गुरू, कथित देशविरोधी शक्ती आणि ‘रेजिम चेंज’च्या विधानांचा संदर्भ देत शिवाजी पार्क येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली.
 
"शिवाजी पार्क येथे एकेकाळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार बळकट केला आणि ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ या घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवल्या", असे नितेश राणे म्हणाले. मात्र, त्याच शिवाजी पार्कवर उभे राहून आज उद्धव ठाकरे हिंदूविरोधी विचारांना समर्थन देत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्यापेक्षा त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांचे पालन करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले.(Nitesh Rane on Uddhav Thackeray)
 
‘बाळासाहेब म्हणायचे, आय अॅम अ मॅड, मॅड हिंदू असे बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये आहे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या छायाचित्रांऐवजी मोहम्मद अली जिन्ना आणि उमर खालिद यांची छायाचित्रे लावावीत, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. ‘खरंतर शिवाजी पार्कवर गौमूत्र शिंपडलं पाहिजे,’ असेही नितेश राणे म्हणाले. पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या आणि उमर खालिदला मदत करण्याची भाषा करणाऱ्या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील हिंदू समाज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना माफ करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
 
अभिजीत दिपके यांच्या समर्थनाचा मुद्दा उपस्थित करत नितेश राणे म्हणाले, "दिपके हा उमर खालिदचा समर्थक आहे. उमर खालिद हा अफझल गुरूचा समर्थक आहे. या समर्थनाच्या साखळीवरून उद्धव ठाकरे हे अफझल गुरूचे समर्थक ठरतात, असा निष्कर्षही राणे यांनी आपल्या वक्तव्यातून मांडला. अफझल गुरूबाबत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी वाचावेत किंवा पाहावेत, असा खोचक टोलाही नितेश राणेंनी लगावला.(Nitesh Rane on Uddhav Thackeray)
 
‘रेजिम चेंज’च्या चर्चेवरून संजय राऊत यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, राहुल गांधी यांच्या खांद्यावर बसून सरकार बदलण्याची भाषा केली जात असल्याने संजय राऊत यांच्या विधानांमधून उद्धव ठाकरे यांची राजकीय क्षमता आणि ताकद नसल्याचे दाखवून देत आहेत अशी बोचरी टिप्पणीही नितेश राणे यांनी केली.
 
राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवरही राणे यांनी गंभीर आरोप केले. फ्रान्स, बेल्जियम, इटली आणि ब्रिटनसह विविध देशांतील कथित अशांतता निर्माण करणाऱ्या शक्तींशी राहुल गांधी संपर्क साधत आहेत. राहुल गांधी यांचे ‘डीप स्टेट’शी संबंधित व्यक्तींशी संबंध असल्याचा आरोप केला. फ्रान्स, नेपाळ आणि बांगलादेशमधील परिस्थितीचा उल्लेख करत भारतातही अशाच प्रकारची अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत असेही ते म्हणाले.(Nitesh Rane on Uddhav Thackeray)
 
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत राणे यांनी लॉरेन्स बिश्नोईच्या मुद्द्यावरून प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांची तुलना दाऊद इब्राहिमशी करत ठाकरे हे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना तसेच कथित जिहादी शक्तींना बळ देत असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला. दाऊद इब्राहिमने पूर्वी केलेल्या कृत्यांसारखी भूमिका उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आणि मुंबईत बजावत असल्याचे मंत्री नितेश राणे म्हणाले.
 
सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या तपासावरूनही राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारवर प्रश्न उपस्थित केले. दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालाबाबत त्यांच्या पालकांना अडचणींचा सामना करावा लागला. पोस्टमॉर्टेममध्ये अनियमितता झाल्याचे नितेश राणेंनी सांगितले. याउलट, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अशा प्रकरणांत तातडीने कारवाई केली जाते, असेही नितेश राणे म्हणाले.(Nitesh Rane on Uddhav Thackeray)
 
संजय राऊत यांनी एप्रिलमध्ये मोदी सरकार पडेल असे भाकीत केले. याचा समाचार घेत नितेश राणे म्हणाले, एप्रिलपर्यंत मोदी सरकार पडणार नाही. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भारतीयांचा विश्वास आहे. मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचे पुत्र जानेवारी २०२७ पर्यंत मातोश्रीवर असतील की नाही, असा सवाल उपस्थित करत तो ‘हॅप्पी न्यू इयर मातोश्रीमध्ये करतो की आर्थर रोडमध्ये, हे येणारा काळ ठरवेल,’ असे सूचक विधानही नितेश राणे यांनी केले.
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर