मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! तीन महत्त्वाचे उड्डाणपूल आज खुले

शीव, विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोडमार्गावरील पुलांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते लोकार्पण


Mumbai Flyovers Opening 2026
 
मुंबई, : (Mumbai Flyovers Opening 2026)मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे शीव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल आणि गोरेगाव-मुलुंड जोडमार्गावरील उड्डाणपूल गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १ वाजता दृकश्राव्य माध्यमातून या पुलांचे लोकार्पण होणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
 
मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांतील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी हे तीनही प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत. शीव आणि विद्याविहार येथील रेल्वेवरील उड्डाणपुलांमुळे रेल्वे मार्गांवरील अडथळे दूर होण्यासह रस्ते वाहतुकीला दिलासा मिळेल. तर गोरेगाव-मुलुंड जोडमार्गावरील उड्डाणपुलामुळे गोरेगाव पूर्व परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.(Mumbai Flyovers Opening 2026)
 
या लोकार्पण सोहळ्यास लेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, कौशल्य विकासमंत्री आणि मुंबई उपनगरे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, उपमहापौर संजय घाडी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील वाढत्या वाहतूक ताणाच्या पार्श्वभूमीवर या तीन उड्डाणपुलांमुळे प्रवासाचा वेळ वाचण्यासह प्रमुख मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
 
शीवचा ११२ वर्षांचा पूल नव्या रूपात
 
शीव रेल्वे स्थानकाजवळील जुना ११२ वर्षांचा पूल असुरक्षित ठरल्याने त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या विस्तारासाठीही हा पूल महत्त्वाचा आहे. नव्या पुलामुळे रेल्वे रुळांमधील अडथळे दूर होऊन उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. या पुलाचे काम फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, विविध तांत्रिक अडचणींवर मात करत ते चार महिने आधी पूर्ण करण्यात आले आहे.(Mumbai Flyovers Opening 2026)
 
विद्याविहारचा प्रवास ३० मिनिटांवरून १० मिनिटांवर
 
विद्याविहार पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडणारा सुमारे ६५० मीटर लांबीचा उड्डाणपूल प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलामुळे पूर्व-पश्चिम प्रवासासाठी लागणारा वेळ ३० मिनिटांवरून अवघ्या १० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होईल. पुलासोबत रेल्वे स्थानकातील काही सुविधांची पुनर्बांधणी आणि पादचारी जोडमार्गांची व्यवस्थाही करण्यात आली आहे.(Mumbai Flyovers Opening 2026)
 
गोरेगाव-मुलुंड जोडमार्गाला गती
 
गोरेगाव पूर्वेतील रत्नागिरी हॉटेल जंक्शनजवळ उभारण्यात आलेला १.२६ किलोमीटर लांबीचा, तीन अधिक तीन मार्गिकांचा उड्डाणपूल गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. जनरल अरुणकुमार वैद्य मार्गापासून दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील संतोषनगरपर्यंत हा पूल उभारण्यात आला आहे. यामुळे दिंडोशी न्यायालय, रत्नागिरी हॉटेल जंक्शन आणि वालभट नदी चौक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. भविष्यात या जोडमार्गावरील जुळ्या बोगद्यांद्वारे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील संपर्क अधिक सुलभ होणार आहे.(Mumbai Flyovers Opening 2026)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर