मुंबई (Mumbai Airport Illegal Mosque) : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ येथील टॅक्सी पार्किंग परिसरात अवैधपणे उभारण्यात आलेल्या मशिदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली असून, गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी संबंधित ठिकाणी धरणे आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात त्यांनी सहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज चाळके यांना पत्र दिले आहे.
सोमय्या यांनी पत्रात संबंधित बांधकाम अवैध असल्याचा आरोप केला आहे. मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून या बांधकामाला संरक्षण दिले जात असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. संबंधित जागेच्या वापराबाबत आणि बांधकामाच्या वैधतेबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.(Mumbai Airport Illegal Mosque)
पोलिसांकडून तक्रार नोंदवली जात नसल्याचा आरोप
सहर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही एफआयआर नोंदवून घेतला जात नसल्याचा आरोप सोमय्या यांनी पत्रात केला आहे. तसेच संबंधित यंत्रणांकडे यापूर्वी तक्रारी केल्या असूनही कारवाई होत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.(Mumbai Airport Illegal Mosque)
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
टर्मिनल-१ परिसरातील अशाच प्रकारच्या बांधकामाचा संदर्भ देत सोमय्या यांनी न्यायालयीन आणि प्रशासकीय कारवाईचा उल्लेख केला आहे. टर्मिनल-२ येथील बांधकाम तातडीने हटवावे, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, संबंधित बांधकामाची अधिकृत स्थिती, त्यासाठी आवश्यक परवानग्या आणि सोमय्या यांनी केलेल्या आरोपांबाबत विमानतळ प्रशासन, संबंधित विकास प्राधिकरण तसेच पोलिसांची बाजू स्वतंत्रपणे स्पष्ट होणे आवश्यक आहे. गुरुवारी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.(Mumbai Airport Illegal Mosque)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक