काश्मीर ते कन्याकुमारी एकता प्रवास; IACDE ची युनिटी राइड मुंबईत दाखल

    21-Oct-2026   

IACDE Unity Ride Mumbai
 
मुंबई : (IACDE Unity Ride Mumbai)देशभरातील दंतवैद्यांना एकतेच्या धाग्यात बांधणारी इंडियन असोसिएशन ऑफ कन्झर्व्हेटिव्ह डेंटिस्ट्री अँड एन्डोडॉन्टिक्स (IACDE) या संस्थेची ‘वन नेशन, वन असोसिएशन’ संकल्पनेवर आधारित ‘युनिटी राइड’ मुंबईत दाखल झाली आहे. काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास करणाऱ्या या उपक्रमातून दंतवैद्यांमधील बंधुभाव, एकता आणि व्यावसायिक सहकार्याचा संदेश दिला जात आहे.
 
देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रवास करणारा IACDE चा ध्वज हा या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. कन्झर्व्हेटिव्ह डेंटिस्ट्री अँड एन्डोडॉन्टिक्स या दंतवैद्यकीय शाखेतील तज्ज्ञ, व्यावसायिक आणि संबंधित घटकांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या माध्यमातून केले जात आहे.(IACDE Unity Ride Mumbai)
 
गुजरातमधील पथकाकडून महाराष्ट्रातील पथकाकडे IACDE चा ध्वज अभिमानाने सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर आज नवी मुंबई येथील टेरना डेंटल कॉलेजच्या पथकाकडून मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता तसेच कन्झर्व्हेटिव्ह डेंटिस्ट्री अँड एन्डोडॉन्टिक्स विभागाचे प्राध्यापक यांच्याकडे हा ध्वज सुपूर्द करण्यात आला. या हस्तांतरणामुळे युनिटी राइडच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला.
 
नवी मुंबईहून मुंबईत पोहोचलेला हा ध्वज आता संगमनेरच्या दिशेने रवाना होणार असून, तेथे संगमनेरच्या पथकाकडे तो सुपूर्द करण्यात येईल. त्यानंतर हा प्रवास कर्नाटकच्या दिशेने पुढे सुरू राहणार आहे. या माध्यमातून देशभरातील IACDE सदस्यांमध्ये एकता आणि सहकार्याची साखळी अधिक दृढ होणार आहे.(IACDE Unity Ride Mumbai)
 
‘युनिटी राइड’ हा केवळ भौगोलिक अंतर पार करणारा प्रवास नसून, तो दंतवैद्यकीय क्षेत्रातील सामायिक मूल्ये, व्यावसायिक नाती आणि सामूहिक बांधिलकीचे प्रतीक आहे. विविध राज्यांतील पथकांना एकत्र आणत या उपक्रमातून IACDE परिवाराची ताकद आणि शाखेची सामूहिक ओळख अधोरेखित होत आहे.
 
या उपक्रमात विविध पथकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून दिलेल्या सहकार्यामुळे युनिटी राइडला चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी एकता, परस्पर सहकार्य आणि बंधुभाव हीच मजबूत संघटनेची प्रमुख आधारस्तंभ असल्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.(IACDE Unity Ride Mumbai)
 
काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास करणारा IACDE चा ध्वज आता राष्ट्रीय अभिमान, व्यावसायिक एकजूट आणि दंतवैद्यांमधील दृढ बंधुभावाचा संदेश देशभर पोहोचवत आहे.
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर