पुणे विमानतळावर ४४ लाखांचा गांजा जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक

    21-Oct-2026   
 
(Hydroponic Cannabis Seized at Pune Airport)
मुंबई (Hydroponic Cannabis Seized at Pune Airport) : पुणे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून १.२६५ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. बेकायदेशीर बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत अंदाजे ४४.२७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. पुणे सीमाशुल्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातून आलेल्या प्रवाशाला हवाई गुप्तचर विभागाच्या आणि पुणे सीमाशुल्क विभागाच्या विमानतळ पथकातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. प्रवाशाच्या हालचालींचे विश्लेषण आणि नियमित क्ष-किरण तपासणीदरम्यान संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली.
प्रवाशाच्या काळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेची सखोल तपासणी केली असता, बॅगेच्या बाजूच्या अस्तराखाली, वैयक्तिक वस्तूंच्या खाली विशेष पद्धतीने तयार केलेले दोन गुप्त कप्पे आढळले. बॅगेचे आतील अस्तर कापून तपासणी केली असता, त्यातून आयताकृती, लाद्यांच्या आकाराची, निर्वात पद्धतीने बंदिस्त केलेली आणि अनेक थरांच्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली दोन पाकिटे सापडली. या पाकिटांमध्ये पिवळसर-हिरव्या रंगाचा वाळलेला फुलोऱ्यासारखा पदार्थ होता. प्राथमिक चाचण्यांमध्ये हा पदार्थ गांजा किंवा हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले, असे सीमाशुल्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.(Hydroponic Cannabis Seized at Pune Airport)
एकूण १.२६५ किलो वजनाचा हा अमली पदार्थ अमली पदार्थ आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (एनडीपीएस कायदा) यातील तरतुदींनुसार जप्त करण्यात आला. संबंधित प्रवाशाला कायदेशीर प्रक्रियेनुसार अटक करून सक्षम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या अमली पदार्थांचा मूळ स्रोत शोधणे तसेच त्याच्या पुरवठा साखळीतील मागील आणि पुढील दुव्यांचा मागोवा घेणे यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पुणे सीमाशुल्क विभागाने सांगितले.(Hydroponic Cannabis Seized at Pune Airport)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर