मुस्लिमांच्या बाबतीत जगात जरा कुठे खुट्ट झाले की, काँग्रेसच्या काळजाला लगेच पीळ पडतो! लोकशाहीचा गळाच काय कापला जातो, मानवतेची हत्याच काय होते! अल्बानियातील जाळपोळीचे आरोप मुस्लिमांवर झाल्यावर काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी, असा आरोप स्थलांतरित आणि मुस्लिमांवर करणे योग्य नसल्याचे म्हटले. तसेच, अल्बानियातील जाळपोळीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे जावईच कारणीभूत असल्याचा आरोपही केला. याचे कारण जे काय असायचे ते असो; पण मुस्लिमांवर फक्त आरोप झाल्यावर खेडा यांनी जे रुदन सुरू केले, त्यावरून प्रश्न पडतो की, बांगलादेशात हिंदूंची घरे पेटवली जातात, मंदिरांवर हल्ले होतात, हिंदूंना जीव मुठीत धरून जगावे लागते, तेव्हा काँग्रेसला काय होते? काँग्रेस स्वत:ला सुरुवातीपासूनच, ‘धर्मनिरपेक्ष’ असल्याचे म्हणत आली. धर्मनिरपेक्षतेचा झेंडा खांद्यावर मिरवणार्यांच्या खांद्यावरचे ओझे किती आहे, हे त्यांच्या कृतीवरूनच कळते. हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्न आला की, यांना धर्मनिरपेक्षता आठवते आणि मुस्लिमांचा प्रश्न आला की, मानवतेचा साक्षात्कार! हा काय न्याय झाला? हिंदूंच्या डोळ्यांतील अश्रू पाण्याचे आणि मुस्लिमांच्या डोळ्यांतील अश्रू मोत्यांचे आहेत का?
केरळमध्ये डाव्यांनी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या हत्या केल्या, त्यांच्या कुटुंबीयांचे संसार उद्ध्वस्त झाले, ते सांडले ते रक्त नव्हते? तेव्हा काँग्रेसची मानवता कुठे होती? केरळम्मध्ये तर काँग्रेस डाव्यांच्या विरोधात लढत असतानाही, डाव्यांच्या या हिंसेच्या निषेधाचे सामर्थ्यही काँग्रेसचे युवराज दाखवू शकले नाहीत. अलीकडे दिल्लीतील आंदोलनात आखूड बाह्याचे टी-शर्ट घालून ते कितीही बेटकुळ्या फुगवून दाखवू देत, कोणालाच घाबरत नसल्याच्या बढाया मारू देत; मात्र त्यांना मुस्लीम मतपेटी दुखावण्याचे भय आहेच. वास्तविक, काँग्रेसला महत्त्वाची आहे ती फक्त सत्ता! त्यामुळे ती मिळवून देणारी मते महत्त्वाचीच. अयोध्येतील राम मंदिराला प्राणपणाने विरोध करणारी काँग्रेस, मंदिरउभारणीनंतर ‘राम तो सबके है’ म्हणत सर्वत्र फिरताना देशाने पाहिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एक काँग्रेसविषयीचे विधान प्रसिद्ध आहे, "ज्या दिवशी हिंदूंच्या मताने सत्ता मिळते हे काँग्रेसला कळेल, तेव्हा काँग्रेसजन कोटावर जानवे घालून फिरतील!” स्वातंत्र्यवीरांचे हे वाक्यच काँग्रेसचे बेगडी चरित्र स्पष्ट करते.
राष्ट्रहित सर्वोपरि
देशात लोकशाही धोक्यात आल्याचा डंका पिटायचा, संविधान संकटात असल्याची बांग द्यायची आणि प्रत्येक गोष्टीत मोदी सरकारच्या नावाने ‘शिमगा’ करायचा, हा काँग्रेसचा अलीकडचा नित्याचा उद्योग! युवराज राहुल गांधी यांना तर सरकारवर टीका केल्याशिवाय, एक घासही गळ्याखाली जात नसावा. विरोधक म्हणून हे कदाचित योग्य असेलही. पण, देशहिताच्या प्रश्नात राजकारणाच्या पलीकडे जाण्याची अक्कल दाखवावी लागते. काँग्रेसकडे त्याचाच दुष्काळ आहे. अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर भारताची अण्वस्त्रविषयक भूमिका मांडण्यासाठी, केंद्र सरकारने काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांना पाठवले होते. तसा, ‘ऑपरेशन सिंदूर’वेळेच्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. इथे तिवारी हे काँग्रेसचे आहेत, हाच महत्त्वाचा भाग. सरकारच्या प्रत्येक गोष्टीत खोट काढणार्या, आठवड्याभरापूर्वी ‘रिजीम चेंज’ची धमकी दिलेल्या विरोधी कंपूतील एका खासदाराची सरकारने देशाच्या प्रतिनिधित्वासाठी निवड केली, यालाच म्हणतात लोकशाही! लोकशाहीच्या नावाने नारेबाजी करुन त्याचा अर्थ समजणार नाही.
इतिहासात डोकावले असता, एक असाच प्रसंग आठवतो. १९९४ मध्ये काश्मीरच्या प्रश्नावर पाकिस्तानने भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारने, विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांना भारताची बाजू मांडण्यासाठी जिनिव्हाला पाठवले. यातून भारततीय लोकशाही भक्कम असल्याचे सिद्ध झाले. भारताच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आल्यास, पक्षीय राजकारण बाजूला ठेवण्याचा विवेक तेव्हाच्या नेतृत्वाकडे होता. पण, आज काँग्रेस नेतृत्त्वाकडे तो भिंग घेऊन शोधावा लागेल? सैनिकांच्या शौर्यावर, देशाच्या संरक्षण व्यवस्थांवर संशय निर्माण करून राहुल गांधी कोणती देशभक्ती दाखवतात? काँग्रेस सदोदित स्वातंत्र्यलढ्याचा वारसा सांगते. भाजपकडून राष्ट्रभक्ती शिकण्याची गरज नसल्याचेही छातीठोकपणे सांगते, ठीक आहे! पण, एवढ्या अनुभवी पक्षाला अनेकदा देशहिताच्या प्रश्नावर पक्षीय अहंकार बाजूला ठेवण्याचा विवेकही दाखवता येत नाही, हे अनाकलनीयच! म्हणूनच, ‘अहं ब्रह्मास्मि’च्या बेगडी थाटात वावरणार्या सध्याच्या काँग्रेस नेतृत्त्वाने, वारशाचे बुडबुडे उडवण्यापेक्षा भाजपकडून देशहितासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याचा धडा शिकावा. कारण, राष्ट्रहितच सर्वोपरि!
लेखक- कौस्तुभ वीरकर