ठाणे, : (Thane Water Shortage Plan 2027)अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी वर्षभरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. ३० जून २०२७ पर्यंत दर १५ दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. पाणीगळती आणि चोरी रोखण्यासह अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई, टँकरच्या पाणीपुरवठ्यावर नियंत्रण आणि पर्यायी जलस्रोतांचा वापर यावर भर देण्यात येणार आहे. दरम्यान, मेट्रो, एलिव्हेटेड कॉरिडॉर, कोस्टल रोड आणि रिंग मेट्रो या मोठ्या प्रकल्पांना महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला आहे.
पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आयुक्त राव यांनी संबंधित विभागप्रमुखांची बैठक घेऊन पाणीपुरवठ्याचा विभागनिहाय आढावा घेण्याचे निर्देश दिले. ज्या भागांत झोनिंग पद्धतीने पाणीपुरवठा केला जाणार आहे, तेथील नागरिकांना आधीच माहिती द्यावी, जेणेकरून त्यांना घरगुती वापरासाठी पाण्याचे नियोजन करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Thane Water Shortage Plan 2027)
अनधिकृत जोडण्यांवर कारवाई, टँकरवर नजर
शहरातील अनधिकृत नळजोडण्या शोधून त्या खंडित करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय पथके तयार करण्यात येणार आहेत. संबंधित प्लंबरविरुद्ध पाणीचोरीचे गुन्हे दाखल करण्याचीही कार्यवाही केली जाणार आहे. पाणीवितरणातील व्हॉल्व्हमॅनच्या कामकाजावर लक्ष ठेवतानाच एकाच ठिकाणी दीर्घकाळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेच्या टँकरचे जीपीएस मॅपिंग केले जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर टँकरची ऑनलाइन नोंदणी आणि नोंदवही व्यवस्थापनाची यंत्रणा उभारण्याचाही विचार आहे. खासगी टँकर पाणी कोठून भरतात आणि त्यांच्या फिलिंग पॉईंट्सवर पाण्याचा उपसा कसा होतो, यावरही लक्ष ठेवले जाणार आहे.(Thane Water Shortage Plan 2027)
३५० विहिरींपैकी २०२ वापरण्यायोग्य
पर्यायी जलस्रोत उपलब्ध करण्यासाठी शहरातील सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर भर दिला जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील ३५० सार्वजनिक विहिरींपैकी २०२ विहिरी वापरण्यायोग्य असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. त्यापैकी ३५ विहिरी सध्या कार्यरत असून, उर्वरित विहिरींची स्वच्छता, दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिवा, मुंब्रा आणि इतर गावनिहाय भागांतील विहिरींचीही यादी तयार केली जाणार आहे.(Thane Water Shortage Plan 2027)
व्यावसायिक वापरासाठी प्रक्रिया केलेले पाणी
वॉशिंग स्टेशन, बांधकामे आणि उद्यानांच्या देखभालीसारख्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. मोठ्या पायाभूत प्रकल्पांसाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांतून उपलब्ध होणारे प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत.
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी आणि व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्याची योजना आहे. नगरअभियंत्यांच्या स्तरावर दर आठवड्याला बैठका घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. पाणीबचतीबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.(Thane Water Shortage Plan 2027)