मुंबईत तीन दिवसीय ‘इंडिया केम २०२६’ संमेलन; १०० हून अधिक देशांचा सहभाग

२०० हून अधिक कंपन्या मांडणार तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या संधी


 India Chem 2026 Mumbai
 
मुंबई,: ( India Chem 2026 Mumbai)भारताला जागतिक रसायन आणि पेट्रोकेमिकल उद्योगाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले १४ वे ‘इंडिया केम २०२६’ हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद २२ ते २४ ऑक्टोबरदरम्यान मुंबईतील नेस्को येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे. केंद्रीय रसायने व खते तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल.
केंद्र सरकारच्या रसायने व पेट्रोकेमिकल्स विभागातर्फे आणि भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाच्या (फिक्की) सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ॲडव्हान्टेज भारत : उदयोन्मुख जागतिक रसायन उद्योग केंद्र’ ही या वर्षीच्या प्रदर्शनाची संकल्पना आहे. धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील जागतिक नेते, गुंतवणूकदार, संशोधक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर आणून व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्याच्या संधी निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.( India Chem 2026 Mumbai)
 
२०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग
 
या प्रदर्शनात १०० हून अधिक देशांचा सहभाग अपेक्षित असून, जपान हा भागीदार देश म्हणून सहभागी होणार आहे. भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने या सहभागाला महत्त्व आहे. प्रदर्शनात २०० हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून, भारतासह परदेशातील आठ हजारांहून अधिक व्यावसायिक भेट देतील, असा अंदाज आहे. जागतिक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परिषदेत ५० हून अधिक प्रमुख उद्योगप्रमुख सहभागी होण्याची अपेक्षा आहे. गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये पेट्रोलियम, रसायने व पेट्रोकेमिकल्स गुंतवणूक क्षेत्रांतील क्षमता आणि गुंतवणुकीच्या संधी सादर करतील.( India Chem 2026 Mumbai)
 
२०४० पर्यंत एक लाख कोटी डॉलरचे लक्ष्य
 
जगातील रसायन उत्पादक देशांमध्ये भारताचा सहावा, तर आशियात चौथा क्रमांक आहे. भारतीय रसायन उद्योगाचा आकार २०३० पर्यंत ३०० अब्ज डॉलर आणि २०४० पर्यंत एक लाख कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रदर्शनात विशेष रसायने, कृषी रसायने, खते, पेट्रोकेमिकल्स, पॉलिमर, पर्यावरणपूरक उत्पादने, औद्योगिक यंत्रसामग्री, स्वयंचलन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हरित तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होईल. तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त उपक्रम, संशोधन, उत्पादन आणि जागतिक पुरवठा साखळीतील भागीदारीसाठीही संधी उपलब्ध होतील.( India Chem 2026 Mumbai)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर