मुंबई, :(Panvel-Karjat Railway Line)पनवेल-कर्जत नव्या उपनगरीय रेल्वे मार्गिकेचे सप्टेंबर २०२६ अखेर ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (एमयूटीपी-३) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मार्गामुळे नवी मुंबई आणि कर्जत-रायगड परिसरातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे.
पनवेल ते कर्जतदरम्यान २९.६ किलोमीटर लांबीची दुहेरी उपनगरीय रेल्वे मार्गिका उभारण्यात येत असून, या प्रकल्पासाठी २ हजार ७८२ कोटी रुपयांची मंजूर तरतूद आहे. या मार्गामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून, प्रवाशांना कर्जतच्या दिशेने जाण्यासाठी अधिक सोयीचा पर्याय मिळणार आहे.
या प्रकल्पांतर्गत प्रमुख बांधकामांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. यामध्ये नऊ मोठे पूल, ३५ लहान पूल, पाच उड्डाणपूल आणि १६ भुयारी मार्गांचा समावेश आहे. पनवेल आणि कर्जत येथील दोन्ही रेल्वे उड्डाणपुलांची कामेही पूर्ण झाली आहेत. मार्गावरील तिन्ही बोगद्यांचे खोदकाम, अंतिम अस्तरीकरण आणि बॅलेस्टलेस ट्रॅकची कामे पूर्ण झाली आहेत. बोगद्यांमधील विद्युत आणि यांत्रिक यंत्रणांची उर्वरित कामे सुरू आहेत.(Panvel-Karjat Railway Line)
रेल्वे रुळ टाकण्याच्या कामानेही महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. एकूण ६९.७० किलोमीटर ट्रॅकपैकी ६८.७० किलोमीटर ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय, पुणे द्रुतगती मार्गावरील भुयारी मार्गातून रेल्वे रुळ टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पनवेल, चौक आणि मोहपे स्थानकांवरील रेल्वे रुळांमधील आवश्यक बदल आणि पॉइंट बसविण्याची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.
पनवेल येथील नवीन स्थानक इमारत कार्यरत झाली आहे. चिखले आणि मोहपे येथील स्थानक इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. चौक स्थानकातील इमारत आणि भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले असून, फलाटांवरील शेड आणि स्थानक परिसरातील इतर कामे सुरू आहेत. कर्जत स्थानकात फलाटांचा विकास, स्थानक इमारती, फलाटांवरील आच्छादित संरचना, लिफ्ट, जिने आणि सरकते जिने यांसह प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांची कामे प्रगतिपथावर आहेत.(Panvel-Karjat Railway Line)
मार्गावरील सिग्नल यंत्रणेचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मोहपे आणि चौक स्थानकांमधील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेच्या कारखाना स्तरावरील आणि प्रत्यक्ष स्थळावरील चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. दूरसंचार आणि अन्य संबंधित यंत्रणांची कामेही सुरू आहेत.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.