‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी ही केवळ एक नदी नसून महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात गोदावरीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पवित्र नदीच्या तीरावर होणारी आरती ही श्रद्धा, भक्ती आणि भारतीय संस्कृतीचा संगम मानला जातो. मात्र, रामतीर्थ गोदावरी समिती आणि पंचकोठी गंगा-गोदावरी पुरोहित संघ यांच्याकडून, एकाच वेळी दोन आरत्यांचे आयोजन करण्यात येते. तसेच, या दोन्ही संस्थांमध्ये आयोजनावरून बरेच वर्षे वाद सुरू होता. मात्र, येणारा सिंहस्थ कुंभमेळा हा एकोप्याने साजरा व्हावा, या उद्देशाने शासन, प्रशासन, साधू-महंत आणि विविध स्वयंसेवी संस्था एकत्रितपणे काम करणार आहेत. त्यामुळे रामतीर्थ गोदावरी समिती आणि पुरोहित संघ यांच्यातील वाद ही चिंतेची बाब आहे. या मतभेदांवर संघर्षाऐवजी संवाद आणि समन्वयातून मार्ग काढणे, हीच काळाची गरज होती.
त्यामुळे सिंहस्थ प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या पुढाकाराने, दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी परस्पर समन्वय राखण्यास सहमती दर्शवल्याने, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत दि. ३१ ऑक्टोबर रोजी रामकुंडावर होणारे सिंहस्थाचे ध्वजारोहण आणि विश्वविक्रमी गोदा आरतीला वेगळीच झळाळी प्राप्त होईल, यात तिळमात्र शंका घेण्याचे कारण नाही. कारण, कोणत्याही धार्मिक उपक्रमाच्या आयोजनात नियोजन, जबाबदार्यांचे वाटप, धार्मिक विधींचे स्वरूप, आर्थिक पारदर्शकता आणि व्यवस्थापन यांसारख्या बाबी महत्त्वाच्याच असतात. या विषयांवर वेगवेगळी मते असू शकतात मात्र, मतभेदांचे रूपांतर वादात होऊ नये, यासाठीच दोन्ही संस्थांनीही सामंजस्याची भूमिका घेण्याचे काम केले. धार्मिक परंपरांचे जतन आणि आरतीचे सुरळीत आयोजन हे दोन्ही पक्षांचे समान उद्दिष्ट असल्याचे, दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत अधोरेखित झाले. दोन्ही संस्थांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने, गोदावरी आरतीचे आयोजन अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि भव्य होईल आणि गोदावरीच्या तीरावर नक्कीच श्रद्धा, सहकार्य आणि सामाजिक एकात्मतेचे दीप उजळतील.
सिंहस्थाचा धर्मध्वज फडकणार!
नाशिकच्या पवित्र गोदातीरावर पुन्हा एकदा श्रद्धेचा महासागर लोटणार आहे. १२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येणार्या या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औपचारिक प्रारंभाची उत्सुकता, आता सर्वांनाच लागली आहे. येत्या दि. ३१ ऑक्टोबर रोजी, पंचवटीतील ऐतिहासिक रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी संपूर्ण नाशिकनगरी सज्ज होत असून, प्रशासनाकडूनही तयारीला अंतिम स्वरूप दिले जात आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर भारतीय संस्कृती, अध्यात्म, परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा विराट अविष्कार आहे. गोदावरीच्या पवित्र तीरावर फडकणारा धर्मध्वज हा आस्था, चैतन्य आणि नव्या पर्वाचा संदेश घेऊन येणार आहे. रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर होणारे ध्वजारोहण, नाशिकच्या धार्मिक वैभवालाही राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित करेल. राष्ट्रपतींची उपस्थितीच या सोहळ्याचे महत्त्व अधिक अधोरेखित करते.
सोहळ्याची वेळ जवळ येत असतानाच, प्रशासनाची धावपळही निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. रामकुंड परिसराची स्वच्छता, घाटांचे सुशोभीकरण, रस्ते व पायाभूत सुविधांची पूर्तता, वाहतूक नियोजन, वाहनतळ, आरोग्यसेवा आणि सुरक्षाव्यवस्था यांवरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. राष्ट्रपतींसह मान्यवरांच्या उपस्थितीमुळे, सुरक्षेची जबाबदारीही अधिक महत्त्वाची ठरणार आहे. भाविकांची गैरसोय टाळणे, गर्दीचे नियोजन करणे आणि प्रत्येक विभागामध्ये समन्वय राखणे, ही प्रशासनासमोरील प्रमुख आव्हाने. मात्र, या सोहळ्याचे यश केवळ भव्य मंडप, आकर्षक रोशणाई किंवा चकचकीत घाटांमध्ये मोजता येणार नाही. गोदावरीचे पावित्र्य, परिसराची स्वच्छता, भाविकांची सुरक्षितता आणि धार्मिक परंपरांचा सन्मान यांतच त्याचे खरे यश दडलेले आहे. प्रशासन, धार्मिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी एकदिलाने काम केल्यास, या ऐतिहासिक सोहळ्याला अधिक भव्यता आणि शिस्त लाभेल. गोदावरीच्या साक्षीने धर्मध्वज उंचावेल, तेव्हाच तो केवळ एका पर्वाचा प्रारंभ नसेल; तर तो नाशिकच्या श्रद्धेचा, परंपरेचा आणि सामूहिक सामर्थ्याचाही विजय असेल. धर्मध्वज उंचावेल, नाशिकचा गौरव वाढेल आणि सिंहस्थाच्या मंगल पर्वाला दिमाखदार प्रारंभ होईल.