मुंबई, : (Mumbai Coastal Road North Project)मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक वेगवान आणि सुगम करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या मुंबई किनारा रस्ता (उत्तर) प्रकल्पाच्या कामांना गती देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. सोमवार दि. १९ ऑक्टोबर त्यांनी प्रकल्पाच्या विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कामांचा आढावा घेतला. कामांचे सूक्ष्म नियोजन, संबंधित यंत्रणांमधील समन्वय आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सुमारे ६० किलोमीटर लांबीचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेसावे ते भाईंदर ही दोन शहरे किनारा मार्गाने जोडणार आहे. आंतरबदल आणि जोडरस्त्यांसह प्रकल्पाची अंमलबजावणी सात पॅकेजमध्ये करण्यात येत आहे. या पाहणी दौऱ्याची सुरुवात दिंडोशी न्यायालय परिसरातील गोरेगाव कनेक्टरच्या उन्नत मार्गापासून झाली.(Mumbai Coastal Road North Project)
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, तो किनारा रस्त्याशी जोडण्यात येणार आहे. गोरेगाव ते ओबेरॉय मॉलदरम्यानच्या उड्डाणपुलाच्या ३८ खांबांपैकी ११ खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी जलवाहिनी स्थलांतराचे काम सुरू आहे. गोरेगावमधील विद्यमान वीर सावरकर (एमटीएनएल) उड्डाणपूल न पाडता त्यावरून नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे.
लोखंडवाला-मिल्लत नगर जंक्शन येथे सुमारे १० हेक्टर जागेचे संपादन पूर्ण झाले असून, पायलिंग सुरू आहे. भगतसिंग नगर येथील ओशिवरा खाडीवरील उड्डाणपुलाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. आवश्यक बांधकामे हटविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी समन्वय साधण्यासही सांगितले.(Mumbai Coastal Road North Project)
मालाडमधील माईंडस्पेस परिसरातील पायलिंग, उद्यानाची संरक्षक भिंत आणि उच्चदाब विद्युत वाहिनीमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच, चारकोप येथे माईंडस्पेस ते चारकोपदरम्यानच्या प्रत्येकी ३.९ किलोमीटर लांबीच्या दुहेरी भूमिगत बोगद्यांसाठी लॉन्चिंग शाफ्टचे काम सुरू आहे. चारकोप ते गोराईदरम्यानच्या ३.७८ किलोमीटर मार्गाचीही पाहणी करण्यात आली. आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि तांत्रिक संसाधनांचे योग्य नियोजन करून सर्व कामे सुरक्षिततेचे निकष पाळत वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.(Mumbai Coastal Road North Project)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.