मुंबई महापालिकेचे कामकाज होणार डिजिटल; १४ हजार वापरकर्त्यांचा टप्प्याटप्प्याने समावेश

फाईल्स, पत्रव्यवहार आणि मंजुरी प्रक्रिया होणार ऑनलाइन; प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग वाढणार

 
Mumbai BMC E-Office System
 
मुंबई, : (Mumbai BMC E-Office System)बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली लागू करण्यात येत आहे. या प्रणालीअंतर्गत कार्यालयीन फाईल्स, पत्रव्यवहार, प्रस्ताव आणि मंजुरीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. संपूर्ण महानगरपालिकेत टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणाऱ्या या प्रणालीमध्ये सुमारे १४ हजार वापरकर्त्यांचा समावेश केला जाणार आहे.
 
मुंबई महानगरपलिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक नुकतीच वरळी येथील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीत ई-ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्रशासकीय नियोजनाचा आढावा घेण्यात आला.(Mumbai BMC E-Office System)
 
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुंबई महापालिकेत ही प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामुळे कार्यालयीन फाईल्स तयार करणे, त्यावर टिप्पण्या नोंदवणे, प्रस्ताव सादर करणे आणि मंजुरी घेणे ही कामे ऑनलाइन करता येणार आहेत. ई-ऑफिस प्रणालीद्वारे आवक-जावक पत्रव्यवहाराची नोंद ठेवणे, प्राप्त पत्रे स्कॅन करून प्रणालीमध्ये समाविष्ट करणे आणि त्यावरील कार्यवाहीचा मागोवा घेणे शक्य होणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे फाईल पाठविणे, डिजिटल स्वाक्षरीद्वारे मंजुरी देणे आणि प्रलंबित प्रकरणांची माहिती मिळविणेही सुलभ होईल.
 
महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये ही प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. त्यामध्ये सुमारे १४ हजार वापरकर्त्यांचा समावेश असेल. प्रणालीचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी विविध स्तरांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रणालीच्या अंमलबजावणीबाबत परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.(Mumbai BMC E-Office System)
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर