ठाणे (Pradeep Purnekar Murder Case) : शिवसेना (उबाठा)चे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून ठाणे पोलिसांनी निखिल यादव आणि नितेश पवार या दोघांना अटक केली आहे. तर संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली हा अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी मानपाडा परिसरातील कार्यालयात गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात यापूर्वी पप्या शिंदे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासाचा वेग वाढवत पोलिसांनी आता निखिल यादव आणि नितेश पवार यांना अटक केली आहे. (Pradeep Purnekar Murder Case)
या हत्येचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. या पथकाचे नेतृत्व पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव करत आहेत. हत्येमागील नेमका हेतू, कटाचा सूत्रधार आणि हत्येत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे. (Pradeep Purnekar Murder Case)
दरम्यान, या प्रकरणात राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू असून पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. दोघांनीही हे आरोप फेटाळले आहेत. मात्र ठाणे पोलिस यंत्रणा सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (Pradeep Purnekar Murder Case)