अराजकता पसरवणारा कचरा बाहेर काढा; मंत्री मंगलप्रभात लोढा

महात्मा गांधी जयंतीनिमित्त मणिभवन येथे स्वच्छता अभियान


Mangal Prabhat Lodha Cleanliness Drive
 
मुंबई (Mangal Prabhat Lodha Cleanliness Drive) : देशभरात स्वच्छता अभियान राबवले जात असताना समाजात आणि देशात अराजकता पसरवणाऱ्या प्रवृत्तींचीही स्वच्छता होणे आवश्यक आहे. अशा प्रवृत्ती देशासाठी कचरा असून, तो बाहेर काढला तरच लोकशाहीचे रक्षण होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
 
शुक्रवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या 'सेवा संकल्प अभियानांतर्गत' भारतीय जनता पार्टी, मलबार हिल विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. गावदेवी येथील मणिभवन परिसरात हे अभियान पार पडले. यावेळी ते बोलत होते. (Mangal Prabhat Lodha Cleanliness Drive)
 
माध्यमांशी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) शिवाजी पार्क येथे आंदोलन करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. झारखंडमध्ये पेपरफुटीच्या प्रकरणावर आंदोलन झाले, त्यावेळी सीजेपीचे कार्यकर्ते तिथे का गेले नाहीत? यावरून त्यांचे आंदोलन केवळ दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांपुरते मर्यादित असल्याचे दिसते. या आंदोलनामागे विद्यार्थ्यांचे हित नसून, विरोधकांकडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षाचे काम प्रत्येक गोष्टीला विरोध करणे हेच आहे. त्यांनी विरोध जरूर करावा, त्याबद्दल कोणतीही हरकत नाही. मात्र, देशात ज्या पद्धतीने अराजकता पसरवली जात आहे, त्यातून संविधान मानणाऱ्या लोकांनाच आव्हान दिले जात आहे. हे विरोधी पक्षांचे षडयंत्र असून, यात विदेशी ताकदही सामील आहे," असा आरोप त्यांनी केला. (Mangal Prabhat Lodha Cleanliness Drive)
 
स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी
 
"परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ एकट्या व्यक्तीची जबाबदारी नसून, त्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपला परिसर प्रामाणिकपणे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे," असेही ते म्हणाले. (Mangal Prabhat Lodha Cleanliness Drive)
 
दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मणिभवन येथे महात्मा गांधी वास्तव्यास असलेल्या खोलीची, त्यांचा चरखा, टेलिफोन तसेच इतर ऐतिहासिक वस्तूंची आणि खादी कापडाच्या प्रदर्शनाची पाहणी केली. त्यानंतर मणिभवनसमोरील रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने 'स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई' या संदेशाद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी जयंतीनिमित्त उपस्थितांनी 'रघुपती राघव राजाराम' या गांधीजींच्या आवडत्या भजनाचे सामूहिक गायनही केले. (Mangal Prabhat Lodha Cleanliness Drive)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर