जनजातीय क्षेत्राच्या विकासासाठी ₹25,000 कोटींची तरतूद!

Maharashtra Tribal Area Development
 
 
मुंबई,(Maharashtra Tribal Area Development) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'जनजातीय संकुल विकास परियोजना, महाराष्ट्र' कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवली. संसदीय संकुल विकास परियोजनेअंतर्गत तयार होणाऱ्या कार्ययोजना राबविण्यास राज्य सरकार तत्पर असून या योजनेच्या माध्यमातून जनजातीय क्षेत्राच्या विकासासाठी ₹25,000 कोटींची तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. (Maharashtra Tribal Area Development)
 
जनजातीय क्षेत्राच्या विकासासाठी परियोजनेच्या माध्यमातून गावातच रोजगारनिर्मिती करून स्थलांतर रोखण्यासह जनजातीय क्षेत्रातील नागरिकांचे जीवनमान उंचावून सामाजिक परिवर्तन घडविता येईल. आदिवासी क्षेत्राचा विकास, नागरिकांचे जीवनमान उंचावणे, रोजगारनिर्मिती आणि स्थलांतर रोखणे ही परियोजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनजातीय क्षेत्रासाठी असलेल्या योजनांचे समायोजन करून एकाच गावाऐवजी गावांचा समूह तयार करीत एकात्मिक पद्धतीने विकास करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या जीवनात उन्नती घडविणाऱ्या उपक्रमांचा त्यात समावेश असणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. (Maharashtra Tribal Area Development)
 
या परियोजनेची संकल्पना 5 ते 6 वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती आणि आता तिची अंमलबजावणी होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात परियोजनेचे चांगले परिणाम झाल्याचे अहवालातून दिसत असून शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.(Maharashtra Tribal Area Development)
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र शासनाने जनजातीय क्षेत्रासाठी तयार केलेल्या दोन योजनांमुळे या क्षेत्राच्या विकासाला गती मिळत आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास अपेक्षित परिणाम साधता येतील. योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासह त्यांच्या अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.(Maharashtra Tribal Area Development)
 
यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार योगेश सागर, संसदीय संकुल विकास परियोजनेचे राष्ट्रीय संघटक व्ही. सतीश, 'योजक सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट'चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. गजानन डांगे व इतर मान्यवर उपस्थित होते. (Maharashtra Tribal Area Development)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर