मुंबई (Dino Morea Mithi River Scam) : मिठी नदी गाळ उपसा गैरव्यवहारप्रकरणी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर रोजी अटक केली. दिनो मोरियाची सकाळपासून या प्रकरणात चौकशी सुरू होती. सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
मिठी नदीच्या गाळ उपशाशी संबंधित कंत्राटांमध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप असून, या प्रकरणात मुंबई महापालिकेला सुमारे ६५.५४ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेने विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. या तपासात कंत्राट प्रक्रिया, ड्रेजिंग उपकरणांचा वापर, संबंधित कंपन्या आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे. (Dino Morea Mithi River Scam)
फोन रेकॉर्डमधून दिनो मोरियाचे नाव समोर
मिठी नदी गैरव्यवहारप्रकरणातील आरोपी केतन कदम याच्या फोन रेकॉर्डच्या तपासादरम्यान दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो मोरिया यांचा आरोपींशी संपर्क असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याच आधारे दिनो मोरियाची यापूर्वीही इओडब्ल्यूकडून चौकशी करण्यात आली होती. मे २०२५ मध्ये दिनो आणि सँटिनो मोरिया यांची चौकशी करण्यात आली होती. तपास यंत्रणांकडून दिनो मोरिया आणि आरोपी केतन कदम यांच्यातील कथित आर्थिक व्यवहारांचाही तपास करण्यात येत आहे. २०१९ ते २०२२ या कालावधीतील काही बँक व्यवहार पोलिसांच्या तपासाच्या कक्षेत असल्याचे यापूर्वी समोर आले होते. (Dino Morea Mithi River Scam)
#WATCH | Mumbai | Actor Dino Morea reaches Mumbai Police Commissioner’s Office to join the investigation in Mithi River desilting alleged scam being investigated by Mumbai EOW pic.twitter.com/BXZ5TnJjV4
मिठी नदीच्या गाळ उपशासाठी बीएमसीकडून विविध कंत्राटे देण्यात आली होती. या कंत्राटांच्या प्रक्रियेत कथित अनियमितता, निविदांमध्ये फेरफार आणि संबंधित पुरवठादारांना फायदा करून दिल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. विशेष ड्रेजिंग उपकरणांच्या खरेदीऐवजी ती भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रक्रियेतही कथित गैरप्रकार झाल्याचा तपास आहे. या प्रकरणात बीएमसी अधिकारी, कंत्राटदार आणि इतर संबंधित व्यक्तींसह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी केतन कदमसह अन्य व्यक्तींवरही यापूर्वी कारवाई करण्यात आली आहे. (Dino Morea Mithi River Scam)
ईडीकडूनही तपास
मिठी नदी गाळ उपसा प्रकरणातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा तपास अंमलबजावणी संचालनालयाकडूनही करण्यात आला होता. २०२५ मध्ये ईडीने मुंबई आणि कोचीतील विविध ठिकाणी छापेमारी केली होती. या कारवाईदरम्यान दिनो मोरियाच्या निवासस्थानाचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Dino Morea Mithi River Scam)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.