‘मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी शब्द पाळला’ एमपीएससी सचिवपदी महेंद्र हरपाळकरांची नियुक्ती; आ. विक्रम पाचपुतेंची एमपीएससी आंदोलनावर प्रतिक्रिया

 
Mahendra Harpalkar MPSC Secretary
 
मुंबई (Mahendra Harpalkar MPSC Secretary) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारासंदर्भात विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला असल्याचे माहिती भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी दिली आहे. ‘कालच्या काल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शब्द पाळला,’ अशी प्रतिक्रिया पाचपुते यांनी दिली.
 
दि. ३० सप्टेंबर रोजी एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची बैठक झाली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कामकाजासंदर्भातील विविध प्रश्न आणि मागण्या मांडल्या. विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी संविधान आणि कायद्याच्या चौकटीत शक्य ते निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पाचपुते यांनी सांगितले. (Mahendra Harpalkar MPSC Secretary)
 
 
 
या बैठकीनंतर १ ऑक्टोबर रोजी महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली. हरपाळकर यांची एमपीएससी सचिवपदी नियुक्ती यापूर्वीही झाली होती.
 
‘विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न’
 
या नियुक्तीबाबत बोलताना आ. विक्रम पाचपुते म्हणाले, “ही संवेदनशील मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकायचे, शक्य तेवढे सकारात्मक निर्णय घ्यायचे आणि दिलेल्या शब्दाची तातडीने पूर्तता करायची. एमपीएससी व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री साहेब जास्तीत जास्त निर्णय घेत आहेत.” (Mahendra Harpalkar MPSC Secretary)
 
दरम्यान, एमपीएससी ही घटनात्मक संस्था असल्याने तिच्या कामकाजातील निर्णय संविधान आणि कायदेशीर प्रक्रियेच्या चौकटीतच होणे आवश्यक असल्याचेही पाचपुते यांनी स्पष्ट केले. “कोणतीही अट किंवा घटनात्मक मर्यादा न मानता केलेली मागणी पूर्ण करणे शक्य नाही. विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांना न्याय मिळावा आणि त्याचवेळी संस्थेची स्वायत्तता अबाधित राहावी, ही आपली स्पष्ट भूमिका आहे,” असे त्यांनी म्हटले. (Mahendra Harpalkar MPSC Secretary)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर