गोदावरीच्या तीरावर निनादणार ५०१ शंखांचा नाद; सिंहस्थ महाकुंभापूर्वी विश्वविक्रमासाठी नाशिक सज्ज

    19-Oct-2026   

 Nashik 501 Conch Shells World Record
 

मुंबई(Nashik 501 Conch Shells World Record) : नाशिकमध्ये येत्या २५ ऑक्टोबर रोजी देवमामलेदार पटांगण येथे गोदावरीच्या तीरावर ५०१ शंखांचा एकसाथ निनाद घुमणार आहे. सामूहिक शंखनादाचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने या अनोख्या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने कोजागरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या तयारीचा प्रारंभ दर्शविणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी हा सामूहिक शंखनाद होणार आहे.
अमेरिकेत ३०३ जणांनी एकत्रित शंखनाद करून यापूर्वी विश्वविक्रम नोंदवल्याचे सांगितले जाते. हा विक्रम मागे टाकण्यासाठी ५०१ सहभागी एकाच वेळी शंखनाद करणार आहेत. प्राचीन भारतीय परंपरेचे आध्यात्मिक महत्त्व आणि नाशिकची सामूहिक सांस्कृतिक ओळख यांचा संगम या उपक्रमातून साधला जाणार आहे. शहरातील नागरिकांसह पर्यटकांनाही नाशिकच्या सांस्कृतिक जीवनातील हा अनोखा क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे.(Nashik 501 Conch Shells World Record)
दि. २५ ऑक्टोबर रोजी होणारा सामूहिक शंखनाद ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी करण्यात येणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला पारंपरिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होणार आहे. भारतीय संस्कृतीत शंख हे धैर्याचे तसेच वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात होत असताना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारा हा शंखनाद श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि सभ्यतागत सातत्याचे प्रतीक ठरणार आहे.
या कार्यक्रमात स्थानिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांच्या सदस्यांसह एकूण ५०१ जण सहभागी होणार आहेत. सर्व सहभागी एकाच वेळी समन्वयाने शंखनाद करतील. या सोहळ्यासाठी अस्सल शंख चेन्नईहून मागवण्यात येत आहेत. भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित होणार आहे.(Nashik 501 Conch Shells World Record)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर