मुंबई (Mohan Bhagwat Shakti Worship) : "शक्ती असेल, तर सर्व काही शक्य होते. शिवातून शक्तीचा ‘इकार’ काढून टाकला, तर केवळ शव उरते. ही शक्ती आहे आणि तिची उपासना करायची आहे. प्रत्येकाने देवीचा आशीर्वाद घेतला पाहिजे, कारण तिच्या आशीर्वादानेच सर्व काही सुरळीत चालते", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
नागपूरच्या धंतोली परिसरातील दुर्गापूजा मंडपात देवीचे पूजन केले. यावेळी त्यांनी शक्तीच्या उपासनेचे महत्त्व विशद केले. त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना आगामी विजयादशमीच्या शुभेच्छाही दिल्या. सद्गुणांना जागृत करण्यासाठी तसेच राष्ट्राच्या नवोत्थानासाठी मातृशक्तीचे महत्त्व काय आहे, यावरही त्यांनी आपले विचार मांडले.
उपस्थितांना संबोधित करताना पुढे ते म्हणाले, देवीच्या उपासनेदरम्यान ‘या देवी सर्वभूतेषु’ या मंत्राचे पठण केले जाते. त्यानंतर देवीच्या विविध गुणांचे स्मरण केले जाते. यामागील भावार्थ असा आहे की, कोट्यवधी लोकांच्या हृदयात देवी आपल्या सद्गुणांसह आणि संपन्नतेसह विराजमान आहे. हे गुण जागृत करण्याची आवश्यकता आहे.(Mohan Bhagwat Shakti Worship)
भगवद्गीतेचा संदर्भ देत ते म्हणाले की, कीर्ती, श्री आणि श्रद्धा यांसारखे सद्गुण आपल्यामध्येच आहेत. हे गुण जागृत करून त्यांना कार्यप्रवण करणे, हीच आपली शक्ती ठरते. देवीच्या सगुण मूर्तीसमोर उपासना करण्यामागील उद्देशही हेच सद्गुण जागृत करणे हा आहे. ही उपासना व्यक्ती, कुटुंब आणि राष्ट्र या तिन्हींसाठी कल्याणकारी असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताच्या नवोत्थानाच्या प्रारंभीच्या काळात रामकृष्ण परमहंस यांनी देवीची उपासना केली होती. त्यांच्या आशीर्वादाने स्वामी विवेकानंद पुढे वाटचाल करू शकले. आज देशातील सार्वजनिक जीवनात आणि विविध कार्यांमध्ये स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले. मातृशक्तीचा संबंध राष्ट्रशक्तीशी जोडताना सरसंघचालकांनी तिची मनोभावे उपासना करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, देवीचा आशीर्वाद आणि आपल्यातील सद्गुण जागृत करून व्यक्तीबरोबरच राष्ट्राची शक्तीदेखील कार्यप्रवण करता येते.(Mohan Bhagwat Shakti Worship)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक