रेशनिंगमध्ये डिजिटल क्रांती; ३५ सेकंदांत मिळणार २५ किलो धान्य

नाशिकमध्ये राज्यातील पहिले ‘ग्रेन एटीएम’ सुरू; २४ तास मिळणार रेशन, ठाणे आणि नागपुरातही लवकरच सुविधा Nashik Grain ATM

    18-Oct-2026   
 
Nashik Grain ATM
 
मुंबई, : (Nashik Grain ATM)रेशनच्या दुकानासमोर तासन्‌तास रांगेत उभे राहण्याची गरज आता कमी होणार आहे. अवघ्या ३५ सेकंदांत २५ किलोपर्यंत धान्य देणारे ‘ग्रेन एटीएम’ नाशिकमध्ये सुरू करण्यात आले आहे. जागतिक अन्न कार्यक्रमाच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या ‘अन्नपूर्ती’ या स्वयंचलित धान्य वितरण प्रणालीचा शुभारंभ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. नाशिक रोड येथील गोरेवाडी रोड, डिस्टिलरी क्वार्टर परिसरात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, या तंत्रज्ञानामुळे रेशनधारकांना वेळेचे बंधन न राहता हक्काचे धान्य सहज उपलब्ध होणार आहे.(Nashik Grain ATM)
 
२४ तास अविरस सेवा
 
यामुळे स्वस्त धान्य दुकानांसमोरील रांगा, वेळेची अडचण आणि वितरणातील मानवी त्रुटी दूर होणार आहेत. २४ तास आणि सातही दिवस अविरत सुरू राहणारे हे यंत्र 'वन नेशन, वन रेशन कार्ड' प्रणालीशी जोडलेले असल्याने महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशाच्या कोणत्याही भागातील स्थलांतरित कामगार आणि पात्र कुटुंबांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.(Nashik Grain ATM)
 
यंत्राची वैशिष्ट्ये कोणती?
 
या स्वयंचलित यंत्रणेची साठवणूक क्षमता २५ क्विंटल असून, केवळ ३५ सेकंदांत २५ किलोपर्यंत गहू किंवा तांदळाचे अचूक वितरण करण्याची क्षमता यात आहे. ई-पॉस प्रणाली आणि आधार संलग्न बायोमेट्रिक पडताळणीद्वारे वितरण होत असल्याने प्रणालीमध्ये पूर्ण पारदर्शकता राहून गैरप्रकारांना आळा बसणार आहे. यासोबतच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन यामध्ये डिजिटल देयक प्रणालीचाही समावेश करण्यात आला आहे. रेशनिंग व्यवस्थेत डिजिटल क्रांती आणणारा हा उपक्रम आगामी काळात राज्यभरात विस्तारित करण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. तसेच लाभार्थ्यांच्या सोयीसाठी केंद्रावर मदत क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पारंपरिक वितरण व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी, वेळेचा अपव्यय आणि वजनातील त्रुटी या तक्रारींना कायमचा आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाशिकनंतर आता ठाणे आणि नागपूर शहरातही हा प्रकल्प लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.(Nashik Grain ATM)
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर