मुंबई (Mumbai Police Drug Seizure): मुंबई पोलिसांनी शहरातील अमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केल्याने गुन्हेAगारांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी नुकत्याच राबवलेल्या दोन दिवसीय विशेष मोहीमेअंतर्गत तब्बल १५ कोटी ८७ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांनी शहराच्या विविध भागांतून सुमारे ४६ किलो अमली पदार्थ जप्त केले. यामध्ये गांजा, एमडी ड्रग्ज, ब्राऊन शुगर, चरस, कोकेन आणि एलएसडी यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. याशिवाय, कफ सिरपच्या ९ हजार ५४० बाटल्या आणि नऊ लाख रुपयांहून अधिक रोख रक्कमही पोलिसांच्या हाती लागली.(Mumbai Police Drug Seizure)
पोलिसांनी केवळ अमली पदार्थांचा साठाच जप्त केला नाही, तर जुन्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या २१ गुन्हेगारांनाही अटक केली. न्यायालयाच्या आदेशानुसार ४० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले. या कारवाईतील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला. या टोळीतील पाच सदस्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या आरोपींना सहजासहजी जामीन मिळणे कठीण होणार आहे. अमली पदार्थांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी बुलडोझरचाही वापर केला. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची २० अनधिकृत घरे आणि बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. तसेच, अमली पदार्थांच्या विक्रीचे अड्डे बनलेल्या १४५ पानटपऱ्याही हटवण्यात आल्या.(Mumbai Police Drug Seizure)
मुंबई पोलिसांनी केवळ अटकसत्र आणि कारवाईपुरते मर्यादित न राहता जनजागृतीवरही भर दिला. शाळा, महाविद्यालये आणि गरबा मंडपांसह नऊ हजारांहून अधिक ठिकाणी जाऊन पोलिसांनी सुमारे एक लाख ८४ हजार नागरिकांना अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. अमली पदार्थांचे व्यसन व्यक्तीचे आयुष्य आणि संपूर्ण कुटुंब कसे उद्ध्वस्त करू शकते, याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. ही संपूर्ण कारवाई ३० जुलैपासून सुरू असलेल्या ‘ड्रग्जमुक्त मुंबई’ आणि केंद्र सरकारच्या ‘नशामुक्त भारत’ अभियानाचा भाग आहे. तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करांविरोधातील ही मोहीम यापुढेही सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.(Mumbai Police Drug Seizure)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक