मुंबई (Maharashtra Sugarcane Workers Drought Crisis) : मराठवाड्यात ग्रामीण भागात पावसाअभावी शेतीची कामे ठप्प झाली असून, त्याचा सर्वाधिक फटका शेतमजूर आणि ऊसतोड मजुरांना बसत आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतात रोजगार मिळेनासा झाला आहे. परिणामी, पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरांना गाव सोडून महाराष्ट्राबाहेर किंवा शहराकडे स्थलांतर करावे लागत आहे.
अशातच यंदा पावसाअभावी उसाची वाढ आणि उपलब्धता प्रभावित झाल्याने ऊसतोडीचा हंगामही अनिश्चित झाला आहे. त्यामुळे वर्षातील आठ महिने रोजगार मिळविण्यासाठी घराबाहेर राहणाऱ्या मजुरांच्या हाताला आता अवघे तीन ते चार महिनेच काम मिळण्याची भीती व्यक्त होत आहे. रोजगाराचा प्रश्न, महागाई आणि मुलांच्या शिक्षणाची चिंता अशा तिहेरी संकटात या कुटुंबांचे जगणे होरपळत आहे. (Maharashtra Sugarcane Workers Drought Crisis)
नांदेड जिल्ह्यातील वारंगा येथील गोदावरी पठाडे यांची व्यथाही ग्रामीण भागातील रोजगाराच्या गंभीर परिस्थितीचे चित्र स्पष्ट करते. “पाऊस पडत नसल्यामुळे आम्हाला काम मिळत नाही. सोयाबीनचे काम संपल्यानंतर पुढे काय करायचे? हा प्रश्न असतो. शेतात काम नाही, शेती नाही, दुकान नाही. मुलांचे शिक्षण, खाणे-पिणे आणि कपड्यांचा खर्च कसा भागवायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“सणासुदीलाही मुलांना कपडे घेता येत नाहीत. दिवाळी कशी साजरी करायची, मुलांना काय द्यायचे, हा प्रश्न पडतो. महागाई वाढली आहे; मात्र आमच्या हाताला काम नाही. पाऊस पडला, तर शेतीची कामे मिळतील. पाऊसच नसल्याने पुढे काय होईल, हे सांगता येत नाही,” अशी हतबलता शेतमजूर असणाऱ्या हिंगोलीतील गोदावरी पठाडे यांनी व्यक्त केली. (Maharashtra Sugarcane Workers Drought Crisis)
“सरकारने आम्हाला थोडीफार मदत करावी. शेतकऱ्यांना दुष्काळामुळे मदत मिळते, तशीच शेतमजुरांनाही मिळायला हवी. गावात रोजगार उपलब्ध झाला, तर मुलांना सोबत घेऊन बाहेर जाण्याची वेळ येणार नाही,” अशी अपेक्षा गोदावरी पठाडे यांनी व्यक्त केली.
रोजगारासाठी गाव सोडण्याशिवाय पर्याय नाही
“गावात रोजगार नसल्यामुळे आम्हाला गाव सोडून जावे लागते. शेत नाही, दुसरा कोणताही व्यवसाय नाही. पाऊस कमी झाल्याने शेतीची कामेही मिळत नाहीत. गावातच काही उद्योग किंवा रोजगार उपलब्ध झाला, तर आम्ही इथेच राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो,” अशी व्यथा ऊसतोड मजूर सुनील यांनी मांडली. (Maharashtra Sugarcane Workers Drought Crisis)
आठ महिने बाहेर, चार महिने घरी
मंगल या महिला मजुरांनीही आपल्या कुटुंबाची व्यथा सांगितली. “आम्हाला आठ महिने बाहेर राहावे लागते. आता पुन्हा ११ तारखेला कोल्हापूरला ऊसतोडणीसाठी जायचे आहे. तिथे झोपड्या उभारून राहावे लागते. दिवसरात्र मेहनत करावी लागते. एवढे करूनही मिळणाऱ्या मजुरीत कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होते,” असे त्यांनी सांगितले.
पाण्याची टंचाई, शेतीची चिंता
पावसाअभावी शेतीचे नियोजनही कोलमडले आहे. पेरणीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने कोणते पीक घ्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेतीची कामे कमी झाल्याचा थेट परिणाम शेतमजुरांच्या रोजगारावर झाला आहे. दुष्काळाचा फटका केवळ शेतमालकांना बसत नाही, तर शेतात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्याही जगण्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात. शेतकऱ्यांना दुष्काळी मदत दिली जाते; त्याचप्रमाणे रोजगारापासून वंचित राहणाऱ्या शेतमजुरांनाही आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी या मजुरांनी केली आहे. (Maharashtra Sugarcane Workers Drought Crisis)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.