मुंबई (Supreme Court Notice to Sanjay Raut): सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यावर आक्षेपार्ह टीका करून अवमान केल्याबद्दल शिवसेना उबाठाचे खा. संजय राऊत आणि पत्रकार निखिल वागळे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या वक्तव्याबद्दल संजय राऊत यांनी सपेशल दिलगिरी व्यक्त केली आहे. "माझ्या बोलण्यातून काही चुकीचे शब्द गेले असतील, तर मी एकदा नव्हे, दहावेळा माफी मागायला तयार आहे,” अशा शब्दांत राऊत यांनी नाक घासले. "न्यायव्यवस्थेचा अवमान करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता,” असेही त्यांनी स्पष्ट केले. (Supreme Court Notice to Sanjay Raut)
"न्यायाधीश राजकीय नेत्यांना भेटतात आणि विविध कार्यक्रमांना उपस्थित राहतात; मग विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटण्यास नकार का?” असा सवाल राऊतांनी केला होता. त्यावरून सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने खा. संजय राऊत आणि पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल केली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने दोघांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. (Supreme Court Notice to Sanjay Raut)
दरम्यान, "शिवसेनेच्या निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणात गेल्या चार वर्षांपासून न्याय मिळण्याची प्रतीक्षा असल्याने मनात अस्वस्थता आणि संताप आहे,” असे राऊत यांनी सांगितले. "या भावनेतून एखादा चुकीचा शब्द तोंडून निघाला असेल, तर त्याबद्दल माफी मागण्यास तयार आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली. "मात्र, लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयाची आहे,” असेही त्यांनी नमूद केले. (Supreme Court Notice to Sanjay Raut)