बीड (Sunetra Pawar Beed Drought): पावसाने दिलेल्या प्रदीर्घ खंडामुळे बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा तसेच प्रशासकीय उपाययोजनांचा सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
यावेळी आ. प्रकाश सोळुंके, आ. धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या बैठकीमध्ये दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. सध्या पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक करपले असून पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पीक नुकसानाची पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बहुतांश पंचनामे पूर्ण होत आले असून अहवाल प्राप्त होताच नियमानुसार पुढील कार्यवाही गतिमान करण्याच्या शिवाय पीक विमा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि अचूकता राखण्याचे निर्देश संबंधित कृषी व महसूल अधिकाऱ्यांना दिले. (Sunetra Pawar Beed Drought)
अनावश्यक खर्च टाळा
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुष्काळ आणि टंचाईच्या काळात नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळावा, लग्न आणि वाढदिवसांवरील खर्च टाळावा तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करावे, असे आवाहन केले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या टँकर्सवर जीपीएस प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात सध्या २२५ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पिण्यायोग्य पाण्याचा वापर कोणत्याही परिस्थितीत बांधकामासाठी करू नये आणि पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, अशाही स्पष्ट सूचना दिल्या. याशिवाय जलस्रोतांचे पुनर्भरण, नदी-नाल्यांचे खोलीकरण, गाळ काढणे आणि विहिरींची दुरुस्ती यांसारखी जलसंवर्धनाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी केल्या. (Sunetra Pawar Beed Drought)
शेतकऱ्यांशी संवाद वाढवून त्यांचे समुपदेशन करा
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच पूर्वनियोजन करावे आणि शेतकऱ्यांना मुरघास, हायड्रोपोनिक्स तसेच अझोला चारा उत्पादनाचे प्रशिक्षण द्यावे. वीबी-जी रामजी योजनेअंतर्गत रोजगार हमीची कामे जलसंवर्धनाशी जोडून प्रभावीपणे राबवावीत, जेणेकरून ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांना स्थानिक पातळीवरच हक्काचा रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांच्यावर स्थलांतराची वेळ येणार नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी थांबून नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, तसेच शेतकऱ्यांशी संवाद वाढवून त्यांचे समुपदेशन करावे आणि त्यांना मानसिक आधार द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पाणी, चारा आणि रोजगारनिर्मिती या सर्व बाबींवर समन्वयाने काम करून नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. शेतकरी बांधवांना या नैसर्गिक संकटातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी राज्य शासन सर्व स्तरांवर उपाययोजना करत असून प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. (Sunetra Pawar Beed Drought)