नागपूर, : (Nagpur Water Supply)नागपूर शहरालगतच्या १२ गावांमधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) संचालक मंडळाने ठोक पाणीपुरवठा पद्धतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. महसूलमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या निर्णयामुळे परिसरातील तीन नगरपंचायती आणि नऊ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सुमारे एक लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
नागपूर महानगरपालिका क्षेत्र आणि शहरालगतच्या पेरी अर्बन क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या दरांमध्ये तफावत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत होत्या. हा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी २३ जानेवारी २०२५ रोजी आढावा बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडेही बैठका घेऊन हा प्रश्न सातत्याने मांडला होता. अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाने ठोक पाणीपुरवठा पद्धतीला मंजुरी दिल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Nagpur Water Supply)
थेट ग्राहकांऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांना पाणीपुरवठा
सध्याच्या व्यवस्थेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून थेट ग्राहकांना किरकोळ स्वरूपात पाणीपुरवठा केला जात होता. नव्या व्यवस्थेनुसार, प्राधिकरणाकडून संबंधित नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींच्या उंच जलकुंभांपर्यंत ठोक स्वरूपात पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना घरगुती नळजोडण्यांद्वारे पाणी वितरित करतील.(Nagpur Water Supply)
या व्यवस्थेमुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक सुलभ होण्यासह खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच, पाणीपुरवठ्याच्या दरांतील तफावत कमी होऊन नागरिकांवरील आर्थिक भार हलका होण्याची अपेक्षा आहे.
स्मार्ट मीटरद्वारे पाणीपुरवठ्यावर नियंत्रण
नव्या पाणी वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी प्रत्येक जलकुंभावर आयओटी (IoT) आधारित स्मार्ट फ्लो मीटर बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मीटरच्या माध्यमातून पाण्याच्या प्रवाहाची आणि वापराची अचूक नोंद ठेवता येणार आहे.
पाणीपुरवठ्यासाठी लागणारा वीजखर्च कमी करून व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.(Nagpur Water Supply)
या नव्या व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी संबंधित ग्रामपंचायती आणि नगरपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासोबत अधिकृत करार करावा लागणार आहे. तसेच, चालू आणि थकीत पाणीपट्टी नियमितपणे भरणे बंधनकारक राहणार आहे.
या १२ गावांना मिळणार लाभ
नगरपंचायत बेसा : बेसा, बेलतरोडी, पिपळा आणि घोगली.
नगरपंचायत बहादुरा : बहादुरा, खरबी आणि गोन्ही सिम.
नगरपंचायत बिडगाव : बिडगाव आणि तरोडी (बु.).
ग्रामपंचायती : हुडकेश्वर (खुर्द), शंकरपूर आणि कापसी (खुर्द).(Nagpur Water Supply)
नागरिकांना परवडणाऱ्या दरात पाणी देण्यास प्राधान्य
या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “नागपूर शहरालगतच्या पेरी अर्बन क्षेत्रातील नागरिकांना समान आणि परवडणाऱ्या दरात शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता होती. यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत थेट ग्राहकांना किरकोळ स्वरूपात पाणीपुरवठा केला जात होता, तर नागपूर महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठ्याची स्वतंत्र व्यवस्था होती. या व्यवस्थांमधील दरांच्या तफावतीमुळे नागरिकांवर आर्थिक भार पडत होता. आता प्राधिकरणाच्या संचालक मंडळाने ठोक पाणीपुरवठा पद्धतीला मंजुरी दिल्याने १२ गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जनतेच्या हितासाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.”(Nagpur Water Supply)