मुंबई (Devendra Fadnavis on Constitution): “जोपर्यंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान अस्तित्वात आहे, तोपर्यंत देशातील निर्णय संसदेतच होतील आणि सत्ताबदल केवळ निवडणुकांच्या माध्यमातूनच होईल,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील सत्ताबदलाच्या चर्चेवरून संविधान आणि लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या उपस्थितीत शुक्रवार,दि. १६ ऑक्टोबर रोजी दादर पश्चिम येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, आमदार अमित साटम, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार महेश सावंत, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. (Devendra Fadnavis on Constitution)
पुढे ते म्हणाले,“हा भारत आहे. हा पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश किंवा श्रीलंका नाही. त्या देशांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भारतीय संविधान नाही; ते संविधान भारताकडे आहे,” असे फडणवीस म्हणाले. भारतीय लोकशाही व्यवस्था आणि संविधानाची ताकद अधोरेखित करत त्यांनी देशातील प्रश्न संविधानिक मार्गानेच सोडविण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
“गेल्या अनेक वर्षांत संविधानावर आणि देशाच्या लोकशाहीवर हल्ले करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. मात्र, भारतीय संविधान इतके मजबूत आहे की, देशाच्या लोकशाहीला कोणीही धक्का लावू शकलेले नाही किंवा संविधानाला कोणीही हटवू शकलेले नाही,” असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Devendra Fadnavis on Constitution)
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय मिळविण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे कोणताही न्याय मिळविण्यासाठी संविधानिक मार्गांचा अवलंब करणे आवश्यक आहे. “या देशामध्ये या संविधानाने प्रत्येकाला न्याय मिळवण्याचा अधिकार दिलाय. संवैधानिक मार्गाने कुठलाही न्याय मिळू शकतो, तो न्याय मिळवण्याचा प्रयत्न करा. पण कोणी असंविधानिक मार्गाने गेला तर त्याचं काय करायचं हे देखील संविधानाने सांगून ठेवलेले आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचे महत्त्वही अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानातील मूल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केली, तर ते केवळ सुजाण नागरिकच नव्हे, तर विकसित भारताचे सारथी बनतील, असे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना विविध समाजघटकांना एकत्र आणून त्यांच्यात एकता, निर्भयता आणि समाजाप्रती संवेदनशीलता निर्माण केली. स्वराज्याची ही मूल्ये आणि भारतीय संविधानाने दिलेली मूल्ये समजून घेणारी व्यक्ती समाजासाठी आणि देशासाठी सकारात्मक योगदान देऊ शकते, असे फडणवीस म्हणाले.
भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून, प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आणि समान संधी देणारी व्यवस्था आहे. विविध भाषा, धर्म, जाती आणि संस्कृती असलेल्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संविधानाने केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या उपक्रमांच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या सुमारे ११०० शाळांतील तीन लाख विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, मूलभूत कर्तव्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे सुशिक्षित, तत्त्वनिष्ठ आणि मूल्यनिष्ठ समाज घडण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमापूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेत सुरु असणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली. मुंबई पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांचे ज्ञान, आकलन आणि आधुनिक तंत्रज्ञानाविषयीची जाण पाहून आनंद झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दोन ते अडीच लाख रुपये शुल्क असलेल्या काही खासगी शाळांमध्ये मिळणाऱ्या शिक्षणापेक्षाही चांगले शिक्षण महापालिकेच्या या शाळेत दिले जात असल्याचे पाहून समाधान वाटल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. (Devendra Fadnavis on Constitution)
महापालिका शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या, रोबोटिक्स आणि STEM प्रयोगशाळा यांसारख्या सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विज्ञानाची आवड वाढविण्यासाठी ‘सायन्स सोमवार’ आणि गणिताची गोडी निर्माण करण्यासाठी ‘गणित गुरुवार’ यांसारखे उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली.
तसेच, महापालिकेच्या शिक्षकांनी लिहिलेलं 'वाचन प्रेरणा’ हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित असून त्यांच्या संघर्षातून, ज्ञानसाधनेतून आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक तयार केले असून, विविध तज्ज्ञांनी त्यासाठी मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकावर आधारित मराठी भाषेतील परीक्षा जानेवारी २०२७ मध्ये घेण्याचे नियोजन असून विजेत्या विद्यार्थ्यांचा दि. १४ एप्रिल २०२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली. (Devendra Fadnavis on Constitution)
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच व्यापक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यावरही प्रशासनाचा भर आहे. विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव मिळावा, यासाठी ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी दिली. (Devendra Fadnavis on Constitution)