मुंबई (Rajnath Singh on Opposition): "काही लोकांना बांगलादेशप्रमाणे भारतातही सत्तापालट हवा आहे. विरोधक ‘डंके की चोट पर’ सरकार बदलण्याची भाषा करत आहेत. लोकशाही संस्था नष्ट करणे आणि देशाला आग लावणे, हाच त्यांचा अजेंडा आहे. विरोधकांना अराजकता माजवून सत्ता मिळवायची आहे,” अशी घणाघाती टीका केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘इंडी’ आघाडीवर केली.(Rajnath Singh on Opposition)
"होय, आम्हाला सत्ता बदलायची आहे,” अशी उघड कबुली प्रशांत भूषण यांनी ‘सीजेपी’च्या पत्रकार परिषदेत दिली होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये बोलताना त्याचा खरपूस समाचार घेतला. "देशातील तरुणांचा अराजकतेच्या राजकारणात प्याद्याप्रमाणे वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही लोकांना बांगलादेशातील घटनांच्या धर्तीवर भारतात सत्तापालट हवा आहे. बांगलादेशातील परिस्थितीतून प्रेरणा मिळाल्याचे ते उघडपणे मान्य करतात, तर काहीजण निर्लज्जपणे सरकार पाडण्याची मागणी करत आहेत. यावरून त्यांचा एकमेव अजेंडा लोकशाही संस्थांचा नाश करणे आणि देशात अशांतता निर्माण करणे, हाच असल्याचे स्पष्ट होते. त्यांचा लढा निवडणूक सुधारणांसाठी नाही, तो ‘एसआयआर’ किंवा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित नाही. देशातील तरुणांचे उज्ज्वल भविष्य हाही त्यांच्या लढ्याचा उद्देश नाही. उलट, देशात अराजकता पसरवून सत्ता बळकावण्याचा हा कट आहे,” असा हल्ला राजनाथ सिंह यांनी चढवला.(Rajnath Singh on Opposition)
"राजकीय स्वार्थासाठी भारतातील घटनात्मक संस्थांचा बळी दिला जाऊ शकत नाही. खोटा आक्रोश व्यक्त करून, संस्थांची बदनामी करण्याचा प्रयत्न करून आणि राजकीय संधिसाधूपणाच्या माध्यमातून भारताच्या विकासयात्रेला बाधा आणता येणार नाही. राहुल गांधी यांनी अडथळे निर्माण करणारे राजकारण करण्याऐवजी जनतेने दिलेल्या जनादेशाचा आदर करावा आणि आपल्या राजकीय भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे,” असा टोला त्यांनी लगावला.(Rajnath Singh on Opposition)
इंदिरा गांधींच्या काळातील सरकारचा उल्लेख करताना ते म्हणाले की, "१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी लोकशाहीला तुरुंगात डांबले होते. त्यांनी लोकशाहीला कैद केले होते. आज राहुल गांधी संविधान आपल्या खिशात ठेवून देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. जी राहुल गांधी यांची काँग्रेस निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करते, त्याच काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेवर कठपुतळीप्रमाणे नियंत्रण ठेवले होते. १९९३ मध्ये काँग्रेस सरकारने निवडणूक आयोगात अचानक बदल केले. रातोरात दोन नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना पदावरून हटवण्याची शिफारस केली होती. नवीन चावला यांनी निवडणूक आयोगातील संवेदनशील माहिती काँग्रेसच्या नेत्यांशी सामायिक केल्याचा आरोप गोपालस्वामी यांनी केला होता,” याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले.(Rajnath Singh on Opposition)