पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २५ वर्षांच्या राष्ट्रसेवेचा गौरव; राज्य मंत्रिमंडळाचा बैठकीत अभिनंदन ठराव

 
Narendra Modi 25 Years of Public Service
 
मुंबई (Narendra Modi 25 Years of Public Service) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नेतृत्वात २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव करणारा अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. गरीब, वंचित आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केलेले कार्य, सुशासन, आत्मनिर्भर भारताची संकल्पना तसेच देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय यांचा या ठरावात उल्लेख करण्यात आला आहे. हा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.
 
पंतप्रधान मोदी यांनी सातत्याने ‘मी प्रधानमंत्री नाही, तर प्रधानसेवक आहे’ ही भूमिका मांडली. संविधान हाच धर्मग्रंथ आणि कर्मयोग हाच जीवनाचा मार्ग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. गरीब नागरिकांना घरे, वीज, पाणी, गॅस, शौचालये आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अंत्योदयाच्या माध्यमातून विकासाचे नवे मॉडेल देशासमोर मांडल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Narendra Modi 25 Years of Public Service)
 
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ मिळाले. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक आणि ऑपरेशन सिंदूरसारख्या कारवायांसह संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेमुळे भारताची जागतिक स्तरावरील प्रतिमा अधिक मजबूत झाली. राम मंदिराची उभारणी, कलम ३७० हटविणे आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला.
 
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात लाभ झाल्याचे सांगताना फडणवीस यांनी राज्यातील सुमारे १२ लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा उल्लेख केला. मेट्रो, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना केंद्र सरकारचे पाठबळ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. (Narendra Modi 25 Years of Public Service)
 
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत महाराष्ट्राला सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील ९१ प्रकल्पांसाठी बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत मदत देण्यात आली. तसेच, पीएम-कुसुम योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ११ लाख ८० हजार कृषी पंप मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ४३ लाख घरे पूर्ण झाली आहेत किंवा निर्माणाधीन आहेत. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ४.४० कोटी कार्ड, पीएम किसान योजनेचा ९१ लाख शेतकऱ्यांना लाभ आणि जनधन योजनेतून सुमारे ३.८३ कोटी बँक खात्यांची निर्मिती झाल्याची माहितीही त्यांनी दिली. (Narendra Modi 25 Years of Public Service)
 
छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा नौदलाच्या ध्वजावर आणणे, त्यांच्या १२ गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देण्याच्या दिशेने केलेले प्रयत्न आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे, या बाबींचाही मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. राज्यात उद्योग, स्टार्टअप, रेल्वे विद्युतीकरण आणि पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
 
२०२९ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. भारत अधिक सुरक्षित, समृद्ध, आत्मनिर्भर आणि विकसित करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या नेतृत्वाबद्दल मंत्रिमंडळाने त्यांचे आभार मानले असून, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी शुभेच्छाही या ठरावाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. (Narendra Modi 25 Years of Public Service)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर