मुंबई (Maharashtra Drought Affected Talukas 2026) : खरीप हंगाम २०२६ मध्ये झालेल्या कमी पावसामुळे राज्यात दुष्काळाचे सावट ओढावले असून, दुष्काळी तालुक्यांची संख्या ३०४ वर पोहोचली आहे. यापूर्वी, दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या २६५ तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-२’अंतर्गत आणखी ३९ तालुक्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. या सर्व तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, बुधवारी मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला.
दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांमध्ये जिल्हाधिकार्यांनी तातडीने पंचनामे सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे, तसेच ‘जीपीएस’ को-ऑर्डिनेट निर्देशांक संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला तत्काळ सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra Drought Affected Talukas 2026)
दुष्काळी जाहीर झालेल्या ३०४ तालुक्यांमध्ये जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात येणार आहे. तसेच कृषिपंपांच्या चालू वीजबिलातही सवलत देण्यात येणार आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले असून, त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या पंपांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे. दुष्काळी तालुक्यांतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, ‘रोजगार हमी योजने’तील कामांच्या निकषांमध्ये शिथिलता करून अधिकाधिक कामे सुरू करणे, गरजेनुसार टँकरने पाणीपुरवठा करणे आणि टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकर्यांच्या कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याशिवाय, शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे, तसेच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Maharashtra Drought Affected Talukas 2026)
३९ नवे दुष्काळी तालुके
पालघर : जव्हार, मोखाडा, तलासरी
रत्नागिरी : लांजा, मंडणगड, खेड
नाशिक : त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड
पुणे : आंबेगाव, जुन्नर
सांगली : शिराळा, वाळवा, खानापूर विटा, तासगाव, कडेगाव, पलुस
सातारा : पाटण, जावळी, वाई, कोरेगाव, कराड
कोल्हापूर : शाहुवाडी, शिरोळ
नांदेड : मुखेड, मुदखेडट
वर्धा : कारंजा
भंडारा : मोहाडी आणि तुमसर
गोंदिया : आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया, अर्जुनी-मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....