आई-वडिलांनी दिलेले पाठबळ, शिक्षणातून मिळालेला आत्मविश्वास, कामातून आलेली समज आणि स्थानिक लोकांशी संवाद साधण्याची भूमिका... यामुळे कांचन पवार यांची वनसेवेतील वाटचाल ही केवळ पदोन्नतींची नाही; तर जंगल आणि माणूस यांच्यातील संवेदनशील आणि समतोल नात्यांची प्रेरणादायी कहाणी आहे.
वनसंवर्धन म्हणजे केवळ जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण नव्हे, तर जंगलाशी जोडलेल्या माणसांचे प्रश्न समजून घेणे. वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित ठेवताना स्थानिकांच्या उपजीविकेला आधार देण्याची भूमिका कांचन ज्ञानोबा पवार यांच्या कार्यातून दिसते. ताडोबातील मानव-वन्यजीव संघर्ष, बफर क्षेत्रातील पर्यटनातून रोजगारनिर्मिती, सामाजिक वनीकरण आणि दक्षिण कोकणातील कांदळवन विभागाची उभारणी अशा विविध जबाबदार्यांतून त्यांनी वनसेवेतील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दि. ३ एप्रिल १९८६ रोजी परभणीत जन्मलेल्या कांचन यांचे शिक्षण परभणी, अहमदपूर आणि राहुरी येथे झाले. परभणी कृषी महाविद्यालयातून कृषिशास्त्राची पदवी, तर महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वनसेवेचा मार्ग निवडला.
शालेय जीवनापासून वक्तृत्व स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय असलेल्या कांचन यांनी कृषी विद्यापीठांच्या राष्ट्रीय युवा महोत्सवांतही विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. वर्तमानपत्रांतून अधिकार्यांच्या मुलाखती वाचताना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. या प्रवासात आई-वडिलांनी दिलेला पाठिंबा निर्णायक ठरला. कृषिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या वडिलांनी मुलीच्या स्वप्नांवर सामाजिक अपेक्षांचे ओझे येऊ दिले नाही. वनसेवेतील अधिकारीपदी निवड झाल्यानंतरही तिच्या विवाहाची चिंता व्यक्त करणार्या समाजातील प्रतिक्रियांपेक्षा त्यांनी तिच्या कर्तृत्वाला महत्त्व दिले. स्वावलंबन, जमिनीशी नाळ आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती हे संस्कार कांचन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनले.
मुलीने उच्चशिक्षण घ्यावे, स्वतंत्रपणे निर्णय घ्यावेत आणि स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहावे, यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. सामाजिक अपेक्षांपेक्षा मुलीच्या क्षमतेवर विश्वास ठेवणार्या या कुटुंबाने त्यांच्या ध्येयाला बळ दिले. २००९ मध्ये वनसेवेची परीक्षा दिल्यानंतर २०१० मध्ये त्यांची निवड झाली. कोइम्बतूर येथील ‘केंद्रीय वन अकादमी’त प्रशिक्षण पूर्ण करून जुलै २०१३ मध्ये त्यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात साहाय्यक वनसंरक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला.
ताडोबातील नियुक्तीदरम्यान कांचन यांनी बिबट्यांच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थानच्या (WII) पथकासोबत क्षेत्रीय काम केले. रेडिओ कॉलर, ‘जीपीएस’ आणि कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने वन्यजीवांच्या हालचालींचा मागोवा घेताना काही बिबटे काही महिन्यांनंतर पुन्हा मूळ परिसराकडे परतल्याचे निरीक्षण समोर आले. या अनुभवातून वन्यजीवांचे वर्तन आणि अधिवास समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित झाले.
मात्र, त्यांचे काम केवळ वन्यजीवांपुरते मर्यादित नव्हते. बफर क्षेत्रातील गावांमध्ये शौचालयांची कमतरता असल्याने पहाटे जंगलालगत जाणार्या ग्रामस्थांचा वन्यप्राण्यांशी सामना होण्याचा धोका होता. ‘इको डेव्हलपमेंट’ समित्या, ग्रामस्थ आणि ‘ताडोबा फाऊंडेशन’च्या सहकार्याने शौचालये उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला. उघड्या विहिरींमध्ये बिबट्या पडण्याच्या घटना टाळण्यासाठी विहिरींची नोंद घेणे आणि त्यांना सुरक्षित करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी आगरझरी परिसरातील बफर सफारीला चालना देण्याच्या प्रयत्नांतही त्यांनी सहभाग घेतला. गावातील तरुणांना पर्यटनाशी जोडल्यामुळे जंगलाचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा मार्ग खुला झाला. संवर्धनात स्थानिकांचा सहभाग वाढवायचा असेल, तर त्यांच्या आर्थिक गरजांचाही विचार करावा लागतो, हा अनुभव त्यांच्या पुढील कामासाठी महत्त्वाचा ठरला.
२०१६ मध्ये नाशिक सामाजिक वनीकरण विभागात नियुक्त झाल्यानंतर त्यांनी वृक्षलागवडीसाठी स्थळांची निवड, रोपवाटिका आणि स्थानिक प्रजातींच्या लागवडीच्या नियोजनात काम केले. २०१९ मध्ये विभागीय वनाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्यानंतर नाशिक येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात नियोजनाची जबाबदारी सांभाळली. अर्थसंकल्पीय प्रस्ताव, निधीचे नियोजन आणि विविध विभागांशी समन्वय साधण्याचा अनुभव त्यांना मिळाला. २०२१ मध्ये ठाणे सामाजिक वनीकरण विभागात नियुक्त झाल्यानंतर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत वृक्षलागवड, तसेच शेतकर्यांच्या बांधांवर आणि पडीक जमिनींवर वृक्षलागवडीच्या योजनांत त्यांनी काम केले. सप्टेंबर २०२४ पासून त्या दक्षिण कोकण कांदळवन विभागाच्या विभागीय वनाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. साहाय्यक वनसंरक्षक प्रियंका पाटील यांच्या मदतीने नव्याने स्थापन झालेल्या विभागाची प्रशासकीय घडी बसवणे, कर्मचार्यांना मार्गदर्शन करणे आणि कामकाजाची पद्धत विकसित करणे, अशी आव्हाने त्यांनी स्वीकारली आहेत. जुलै २०२५ मध्ये त्यांना भारतीय वनसेवेत पदोन्नतीदेखील मिळाली आहे. कांदळवनसंवर्धनाबरोबर, इतर शासकीय विभागांकडून कांदळवन जमिनींचे हस्तांतरण, सागरी कासवसंवर्धनासारखे महत्त्वाचे काम सध्या त्या करत आहेत. सागरी कासवसंवर्धनाच्या कामामुळे स्थानिकांना रोजगार मिळण्याबरोबरच पर्यटनवाढीसदेखील मदत झाली आहे. या संपूर्ण कामात त्यांना वरिष्ठांसोबतच त्यांचे भारतीय वनसेवेतच कार्यरत असणारे पती स्वप्नील घुरे यांचादेखील पाठिंबा आहेच. परभणीतील शालेय जीवनापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज भारतीय वनसेवेतील जबाबदारीपर्यंत पोहोचला आहे.