नद्या आणि जलाशयांतील माशांच्या जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास करत आधुनिक संशोधनातून स्थानिक जलपरिसंस्थांचे महत्त्व अधोरेखित करणारे संशोधक डॉ. रणजित मोहन मोरे यांच्याविषयी...
निसर्गातील जैवविविधतेच्या जतनासाठी, तिचा शास्त्रीय अभ्यास आणि संवर्धन आवश्यक. महाराष्ट्रातील नद्या आणि जलाशयांमधील माशांच्या विविधतेचा अभ्यास करून, या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे संशोधक म्हणजे डॉ. रणजित मोहन मोरे! गोड्या पाण्यातील माशांचे जैववैविध्य, त्यांचे पोषणशास्त्र आणि आनुवंशिक विविधतेवर त्यांचे संशोधन आहे. सध्या ते सोलापूरातील करमाळा येथील, प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागप्रमुख आणि साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. मोरे यांनी पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून ‘प्राणिशास्त्र’ विषयात पदवी, पदव्युत्तर शिक्षण आणि ‘पीएचडी’ पूर्ण केली. २०१८ ते २०२२ या कालावधीत त्यांनी उजनी जलाशयातल्या ‘कॉन्गाटुरी हाफबीक’ (Hyporhamphus limbatus) आणि ‘फ्रेशवॉटर गारफिश’ (Xenentodon cancila) या माशांचे, पोषणमूल्य आणि आण्विक वंशविकासशस्त्रात संशोधन केले. माशांच्या प्रजातींची ओळख, त्यांची आनुवंशिक वैशिष्ट्ये आणि जैवविविधतेतील त्यांचे स्थान समजून घेण्यासाठी, त्यांनी क्षेत्रीय सर्वेक्षणासोबत ‘डीएनए बारकोडिंग’सारख्या आधुनिक पद्धतींचा वापर केला. त्यांच्या संशोधनातून स्थानिक जलपरिसंस्थांमधील माशांच्या विविधतेची माहिती उपलब्ध झाली.
उजनी जलाशयातील माशांच्या जैवविविधतेचे अद्ययावत सर्वेक्षण, हे डॉ. मोरे यांच्या महत्त्वाच्या संशोधनकार्यांपैकी एक. सुमारे एका दशकानंतर केलेल्या या अभ्यासातून, जलाशयातील माशांच्या विविधतेची अद्ययावत नोंद घेण्यात आली. या संशोधनाचे निष्कर्ष २०२५ मध्ये, ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅसा’या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. याशिवाय, उजनीतील माशांच्या नोंदी, जागतिक जैवविविधता माहिती मंचावरही उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे संशोधक आणि विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग करता येतो. डॉ. मोरे यांनी महाबळेश्वरजवळील जोर परिसरापासून कराडपर्यंत, कृष्णा नदीतील माशांचेही सर्वेक्षण केले. यात उत्तर-पश्चिम घाटातील कृष्णा नदी परिसरातील माशांच्या प्रजातींची नोंद त्यांनी केली. तसेच ‘हायफिन ग्लासी पर्चलेट’ (Parambassis lala) या माशाची, वरच्या कृष्णा नदीच्या खोर्यातील नवीन नोंद समोर आली. या संशोधनाशी संबंधित निष्कर्ष २०२५ मध्ये प्रकाशित झाले.
डॉ. मोरे यांच्या संशोधनातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, माशांच्या आनुवंशिक विविधतेचा अभ्यास. ‘एशियन फ्रेशवाटर निडलफिश’ (Xenentodon cancila) या माशावरच्या संशोधनातून, एकाच नामनिर्दिष्ट प्रजातीमध्ये अनेक आनुवंशिक वंशरेषा असल्याचे आढळले. यामुळे यात अधिक सखोल संशोधनाची गरज अधोरेखित झाली. यासंबंधीचा शोधनिबंध २०२६ मध्ये ‘जर्नल ऑफ थ्रेटन्ड टॅसा’मध्ये प्रसिद्ध झाला. उजनी जलाशयात ‘सकरमाउथ कॅटफिश’ (Pterygoplichthys pardalis) आणि ‘रेड-बेलीड पिरान्हा’ (Piaractus brachypomus) या परकीय आक्रमक माशांच्याही नोंदी त्यांनी अभ्यासल्या. स्थानिक जलपरिसंस्थेतील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी, अशा प्रजातींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचेच. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील खारफुटी परिसंस्थांतील नैसर्गिक संसाधनांचे निरीक्षण, हा त्यांच्या संशोधनकार्याचा भाग.
अध्यापन क्षेत्रातही डॉ. मोरे यांचे योगदान महत्त्वाचे. त्यांना पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्याचा, सहा वर्षांहून अधिक अनुभव आहे. प्रात्यक्षिके, संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांमध्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. २०२२ ते २०२५ या काळात त्यांनी इंदापूरच्या 'ITSPMS ASC' महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर संशोधन सल्लागार म्हणूनही विद्यार्थ्यांना संशोधन पद्धती, सांख्यिकी, माहितीचे दृश्यीकरण आणि शोधनिबंध लेखनासाठी मार्गदर्शन केले. एप्रिल २०२६ पासून ते करमाळातील प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयात कार्यरत आहेत.
डॉ. मोरे यांच्या कार्यासाठी २०२५ मध्ये त्यांना, ‘लातूर सायन्स अॅकेडमी, बारामती’ यांच्याकडून ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच २०१९ मध्ये, ‘सारथी’मार्फत त्यांना मुख्यमंत्री विशेष संशोधन फेलोशिप मिळाली. जलचरांच्या जैवविविधतेचा अभ्यास, आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहनातून डॉ. मोरे यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. स्थानिक जलपरिसंस्थांचे महत्त्व समजून घेण्याबरोबरच, जैवविविधतेच्या संवर्धनासाठी शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणारे त्यांचे कार्य, पर्यावरण संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असेच. आज पर्यावरणीय बदल आणि जैवविविधता संवर्धनाचे प्रश्न अधिक तीव्र होताना, स्थानिक परिसंस्थांच्या शास्त्रीय अभ्यासकांची भूमिका मोलाची ठरते. डॉ. मोरे यांचे संशोधनकार्य यादृष्टीनेही महत्त्वपूर्णच. ज्ञानाचा उपयोग निसर्ग अभ्यासासाठी आणि संवर्धनासाठी व्हावा, तसेच नव्या पिढीमध्ये संशोधनाची प्रेरणा निर्माण व्हावी, या व्यापक उद्दिष्टांशी त्यांचे कार्य जोडलेले आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!