पालघर (Nalasopara Crime News): पालघर मधील नालासोपारा येथे आरिफ शेख नामक तरुणाकडून हिंदू मुलींची फसवणूक, धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणि तरुणींचे आक्षेपार्ह चित्रीकरण बनवून ते परदेशात पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरिफ शेख याला अटक करण्यात आली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय व सामाजिक वर्तुळात उमटू लागले असून भाजपने यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला आहे, तर विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणाची उच्चस्तरीय 'एसआयटी' चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नवरात्रीच्या पवित्र काळात हिंदू तरुणींबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याचे उघडकीस आल्यानंतर, ‘सकल हिंदू समाजा’च्या कार्यकर्त्यांनी प्रकरणाचा माग काढून पोलिसांत धाव घेतली. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर आणि हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पीडित तरुणीला हिंमत मिळाली, जिने धाडस दाखवत आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नालासोपारा पोलीस ठाण्यात मुख्य संशयित आरोपी आरिफ आयुब शेख (वय २२), त्याची आई रुक्साना खान आणि मावसभाऊ साहिल खान यांच्याविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची संशयित आरोपी आरिफ शेख याच्याशी ‘सोशल मीडिया सेलिब्रेशन पार्टी’दरम्यान ओळख झाली होती. त्यानंतर त्याने तिला जाळ्यात ओढून जवळीक साधली. आरोपीच्या आईने ज्योतिष विद्येची जाणकार असल्याचे भासवून पीडितेच्या मनात घरच्यांविषयी चुकीची माहिती भरली आणि तिला भूतबाधा झाली असून तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगून भीती निर्माण केली. आणि पीडित तरुणीला आपल्या घरात राहण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेसोबत प्रेमाचे नाटक करून लवकरच लग्न करणार असल्याचे भासवून आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. (Nalasopara Crime News)
आरोपीने पीडित मुलीला "पुढील दोन वर्षांत सर्व हिंदू मुली मुस्लीम होणार आहेत; जे आहे ते स्वीकार कर,” अशी धमकी देत धर्मांतरासाठी दबाव आणला होता. विरोध केला असता, मारहाण व दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपीने ७० ते ८० हिंदू तरुणींना जाळ्यात ओढल्याचा, नवरात्रीच्या सणाबाबत आणि हिंदू मुलींबाबत जिममध्ये अत्यंत आक्षेपार्ह विधाने केल्याचा, तसेच त्यांचे अश्लील चित्रीकरण करून व्हिडिओ परदेशी क्रमांकावर पाठवल्याचा गंभीर आरोप पीडितेकडून केला जात आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याचा व काही व्हिडिओ डिलिट केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, हा प्रकार ‘लव्ह जिहाद’चा असल्याचा तीव्र संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर पोलीस प्रशासनाने दिलेल्या अधिकृत प्रतिक्रियेनुसार नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. डिजिटल पुरावे आणि फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल; तसेच तपासात समोर येणार्या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नालासोपारा येथील प्रकार धक्कादायक आहे. आरोपीचे अनेक मुलींसोबत संपर्क असून यामध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. आरोपीने वेळोवेळी हिंदू मुलींची फसवणूक केली असून अजून मुली आमच्याकडे येत आहेत. चार ते पाच मुलींशी संपर्क सुरू असून त्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात देण्यात येणार आहेत. शिवाय, आरोपी हा एकटा नसून त्याला बाहेरून मदत मिळत असल्याचा दाट संशय आहे. याविषयी सखोल तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याची सूचना पोलिसांना देण्यात आली आहे. - किरीट सोमय्या, भाजप प्रदेश उपाध्यक्ष
‘सकल हिंदू समाज’ कार्यकर्त्यांमुळे प्रकरण उघड
‘सकल हिंदू समाजा’च्या कार्यकर्त्यांना आरोपीने जिममध्ये नवरात्रीबाबत आणि हिंदू मुलींबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांची माहिती मिळताच, त्यांनी तातडीने या प्रकरणाचा माग काढण्यास सुरुवात केली. आरोपी तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे आक्षेपार्ह चित्रीकरण करत असल्याची खात्री पटल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी आणि पोलिसांत धाव घेऊन संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. या घडामोडी समोर आल्यानंतर पीडित तरुणीला धीर मिळाला आणि तिने हिंमत करून आरोपीविरोधात पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणातील डिजिटल पुरावे आणि व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आणून देत, ‘सकल हिंदू समाजा’ने तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच हिंदू महिलांवरील अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी आक्रमक पवित्रा घेतला.
आरोपीची पार्श्वभूमी
मुख्य आरोपी आरिफ आयुब शेख हा नालासोपारा परिसरात जिम इन्स्ट्रक्टर आहे. त्याने जिममध्ये व्यायाम करण्यासाठी येणार्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या तरुणींशी जवळीक साधून त्यांना प्रेमाच्या व लग्नाच्या जाळ्यात ओढले. आरोपीने या तरुणींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून त्यांचा गैरवापर केला. तसेच धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले असून, ते परदेशी क्रमांकांवर प्रसारित केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Nalasopara Crime News)